Top Newsआरोग्य

भारतातील कोरोना विषाणूवर अमेरिकेतील लस प्रभावी !

वॉशिंग्टन : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवा विषाणू B.1.617 Variant भारतात आढळला असून तो वेगाने संसर्ग करतोय. त्यामुळेच अगदी जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्याला धोकादायक विषाणूच्या वर्गात टाकलंय. याच विषाणूने भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ करण्यात मोठी भूमिका निभावली. मात्र, आता भारतासाठी काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या कोरोना लसी या विषाणूवर परिणामकारक आहेत. याबद्दल अमेरिकेचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी ही माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617 या विषाणूला धोकादायक विषाणूंच्या यादीत टाकलंय. हा विषाणू वेगाने संसर्ग करत असल्याचे अनेक पुरावे आहेत. भारतात याच विषाणूने सर्वाधिक लोकांना बाधित केलं आहे. भारताशिवाय हा विषाणू आता जगातील इतर भागांमध्येही वेगाने पसरत आहे.

डॉ. अँथनी फॉसी म्हणाले, अमेरिकेत उपलब्ध असलेल्या कोरोना लसी भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617 या घातक विषाणूवर परिणामकारक आहेत. 617 अँटीबॉडींसाठीच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झालीय. अमेरिकेतील लस या विषाणूवर अंशिक किंवा मोठ्या स्तरावर उपयोगी ठरत आहे. B.1.617 आणि B.1.618 हे कोरोनाचे व्हेरिएंट सर्वात आधी भारतात सापडले. त्यानंतर भारतात कोरोनाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मात्र, अमेरिकेतील लसी या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी शरीरात चांगली रोग प्रतिकारक शक्ती तयार करतात. त्यामुळेच लस घेणं आवश्यक आहे.

व्हाईट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार असलेले अँडी स्लाविट म्हणाले, अमेरिकेतील कोरोना लसी भारतात आढळलेल्या दोन्ही कोरोना विषाणूंवर परिणामकारक आहेत. त्यामुळे आपल्याला लसीकरणं करणं महत्त्वाचं आहे. आपण या कोरोना विषाणूमुळे होणारा विद्ध्वंस पाहिलाय. आपल्याला हेही माहिती आहे की हा विद्ध्वंस आपल्याकडे देखील होऊ शकतो. मात्र, असं होऊ नये अशीच आपली इच्छा आहे. म्हणूनच लसीकरण अत्यावश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button