Top Newsमहिलामुक्तपीठ

न्यायालयाच्या प्रांगणात रंगला महिला वकिलांचा स्नेहमेळावा

महिला न्यायाधीशांचाही उत्स्फूर्त सहभाग

नाशिक (प्रतिनिधी) : ‘सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी, xxxरावांचे नाव घेते साता जन्मांसाठी… ‘ असा पारंपरिक उखाणा घेत वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. भाटीया यांनी महिला वकिलांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभाची सुरुवात केली.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायदान प्रक्रियेतील महत्वाचा घटक असणाऱ्या महिला वकील आणि न्यायाधीशांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ आणि कनिष्ठ न्यायालयाच्या महिला न्यायाधीश तसेच जिल्हा ग्राहक मंचच्या महिला न्यायाधीशांनी या कार्यक्रमांत आपुलकीने सहभाग नोंदवला.

यावेळी न्यायाधाीश श्रीमती प्रतिभा पाटील यांनी, ‘२२ जानेवारीला झाला अयोध्येत श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, केदाररावांचे नाव घेते तिळगुळ घ्या गोड बोला,’ अशी खुमासदार सरुवात करीत महिला वकिलांची मने जिंकली. उपस्थित सर्व महिला न्यायाधीशांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने स्नेहमेळ्याची सुरुवात करण्यात आली. आयोजक समितीच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना संक्रातीचे वाण देण्यात आले.

यावेळी न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. भाटीया यांनी राहुरीत वकील दाम्पत्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगतानाच अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी न्यायव्यवस्था मजबूत करण्यासाठी न्याय प्रक्रियेतील सर्वच घटकांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ विधीज्ञ इंद्राणी पटनी यांनी, राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या दुर्देवी हत्येच्या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा कायदा यावर मार्गदर्शन केले. तर महिला वकिलांचा उत्साही सहभाग लक्षात घेता हळदी-कुंकू सामारंभापेक्षा हे स्नेहमिलन ठरावे असेही त्यांनी सूचित केले. ज्येष्ठ वकील श्रीमती प्रेरणा देशपांडे यांनी ‘मुक्ताई’ या एकपात्री प्रयोगातील एका प्रसंगाचे सादरीकरण केले. यावेळी आयोजित केलेल्या उखाणे, मेहंदी, गायन आणि एकांकीका स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

अ‍ॅड. श्रद्धा कुलकर्णी, अ‍ॅड. स्वप्ना राऊत, अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. पूनम शिनकर, अ‍ॅड. प्रणिता कुलकर्णी, अ‍ॅड.राणी रंधे-तळेकर, अ‍ॅड. सुप्रिया आमोदकर, अ‍ॅड.अश्विनी गवते, अ‍ॅड. सोनल गायकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

हळदी-कुंकू नव्हे, स्नेहमेळावाच!

राहुरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठया संख्येने व्यावसायिक कारणाने एकत्रित येणाऱ्या समुहाचा प्रमुख घटक असणाऱ्या महिला वकिलांनी संकट समयीही एकमेकींसोबत राहण्याचा इरादा या निमित्ताने व्यक्त केला गेला. हा कार्यक्रम पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ असा न होता तो जणू महिला वकिलांचा स्नेहमेळावाच ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button