Top Newsआरोग्य

ठाण्यात पोलिसांसाठी ‘रिहायड्रेशन कवच’!

पोलीस कर्मचाऱ्यांना ७० हजार डब्लुएचओ प्रमाणित ओआरएस बॉटलचे वाटप

ठाणे : वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हात रस्त्यावर तासनतास उन्हाशी दोन हात करीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने दिलासादायक पुढाकार घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी हेलवुड लॅबोरेटरीज प्रा.लि., रोटरी रॉयल फाऊंडेशन आणि आशिष पोद्दार यांच्या माध्यमातून डब्लुएचओ प्रमाणित ७० हजार ओरल रिहायड्रेशन सॉल्ट इलेक्ट्रोलाइट्स रेडी-टू-ड्रिंकचे पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप केले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचा समावेश असून, या अंतर्गत पाच परिमंडळात एकूण ३५ पोलीस ठाणी आणि १८ वाहतुक युनिट कार्यरत आहेत. सध्या कडाक्याच्या उन्हाचा त्रास पोलीसांनीही उद्भवत आहे. विशेषतः उन्हातान्हात रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतुक पोलिसांना झळ बसत आहे. तेव्हा, शरीरातील पाण्याची पातळी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणे गरजेचे असल्याने पोलिसांना तब्बल ७० हजार रिहायड्रेशन बॉटल मोफत वाटप करण्यात आल्या. हा डब्लूएचओ (WHO) प्रमाणित रेडी-टू-ड्रिंक फॉर्म्युला शरीराला त्वरित ऊर्जा देतो, थकवा कमी करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. विशेष म्हणजे, हे पेय तयार स्वरूपात असल्याने पाण्यात मिसळण्याची आवश्यकता नसून बाटली उघडताच थेट पिण्यास योग्य असल्याचे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची घेतलेली ही काळजी केवळ कौतुकास्पद नसून, इतर शासकीय विभागांसाठीही आदर्शवत ठरणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button