‘योगा फॉर युनिटी अँड वेल बिइंग’चे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि श्री रामचंद्र मिशनचे अध्यक्ष व हार्टफुलनेसचे मार्गदर्शक कमलेश पटेल (दाजी) यांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी जगभरातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘योगा फॉर युनिटी अँड वेल बिइंग’ या 100 दिवसांच्या योग आणि ध्यानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पतंजली योगपीठाचे योगऋषी बाबा रामदेव, आयुष मंत्रालयाचे सेक्रेटरी राजेश कोटेचा, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर एच. आर. नागेंद्र यांनी त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाप्रति त्यांची प्रतिबद्धता व्यक्त केली.
जगभरातील सर्व लोक दररोज सकाळी या व्हर्चुअल सत्रात भाग घेऊन आसने शिकू शकतात, जी शतकांची परंपरा असलेल्या अनेक प्रथितयश योगसंस्थांमधील प्रशिक्षकांमार्फत ‘योगा फॉर युनिटी अँड वेल बिइंग’ या सर्वांना एकत्र आणणाऱ्या मंचावरून संचालित केली जातील. शिवाय यात सहभागी होणारे लोक प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या व्याख्यानमालेचाही आनंद घेऊ शकतील. साधकांना प्राणाहुतीच्या माध्यमातून परिवर्तन अनुभवता यावे म्हणून दाजी काही खास ध्यानसत्रे संचालित करतील. सत्रांची ही श्रृंखला उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक योगदिनाच्या दिवशी संपुष्टात येईल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या संदेशात म्हणाले, “स्वामी रामदेवजी, डॉ. एच. आर. नागेंद्र, श्री. कमलेश पटेल आणि इतर योगगुरू, जे त्यांच्या असाधारण परिणामकारकतेने सहभागी साधकांना मदत करणार आहेत, त्यांचे मला खरोखरच मनापासून कौतुक आहे.” ते पुढे म्हणाले, “जग विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीकडे अग्रेसर होत असताना शाश्वतपणे टिकणाऱ्या पद्धतीद्वारे निसर्ग आणि मनुष्यप्राणी यांच्यातील संतुलन पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. योगशास्त्रानुसार आरोग्याची संकल्पना ही निव्वळ शारीरिक स्वास्थ्याच्या पलीकडची आहे. योग हा समग्र कल्याणाकडे घेऊन जाणारा व शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अंतर्भाव असणारा मार्ग आहे. यातून मिळणारे फायदे मानसिक ताण-तणाव आणि शारीरिक व्याधी यांच्यापासून मुक्ती मिळवून देतात. याचा परिणाम उच्च स्तरावरील सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यात होतो. योग हा आध्यात्मिक शांततेचा मार्ग आहे आणि तो कुठल्याही धर्माशी, क्षेत्राशी किंवा लोकांशी निगडित नसून संपूर्ण जग आणि मानवतेशी संबंधित आहे.”
हार्टफुलनेसचे मार्गदर्शक दाजी म्हणाले, “भारत हे जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी असलेल्या अनेकानेक पद्धतींचे माहेरघर आहे. जगभरातील लोकांना सहजपणे योग आणि ध्यान शिकता यावे यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट समन्वयकाची भूमिका पार पाडत आहे याचा मला अभिमान आहे. मी प्रत्येकाला आग्रह करतो की जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, त्यांच्या घरातील आरामदायक वातावरणात राहून सर्वांनी या सत्रांचा लाभ घ्यावा.”
याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये म्हैसूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेमध्ये दाजींनी आवाहन केले होते की सर्व आध्यात्मिक संस्थांनी एकत्र येऊन मानवतेच्या उद्धारासाठी एकत्रितपणे काम करावे. तेव्हापासून हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट निरनिराळ्या आध्यात्मिक, यौगिक व ध्यानसंस्था, तसेच प्रमुख सरकारी संस्थांना एकत्र आणून योग व इतर अशा गोष्टींचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रमुख भूमिका निभावत आहे. दाजींनी दिलेला संदेश अतिशय साधा होता – प्रत्येक योग व आध्यात्मिक संस्था वैयक्तिकरित्या लोकांच्या जीवनावर सखोल प्रभाव टाकून बदल घडवीत आहे. त्या सर्वांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न मानवतेला अत्याधिक वेगाने परिवर्तित करू शकतात.
पतंजली योगपीठाचे अध्यक्ष योगऋषी स्वामी रामदेव या परिवर्तनकारी उपक्रमाच्या निमित्ताने म्हणाले, “या महामारीनंतरच्या जगात योग आणि ध्यानाच्या नवीन पर्वाची ही सुरुवात आहे. जरी बऱ्याच जणांनी योग आणि आसने यांचा सराव करण्यास सुरुवात केलेली असली, तरीही ते याच्या सामुदायिक चेतनेच्या विस्ताराबाबत होणाऱ्या फायद्यांविषयी अनभिज्ञ आहेत.
या सत्रांची शृंखला साधकांना केवळ समग्र कल्याणाच्या सामुदायिक ध्येयाप्रती एकत्र आणणार नाही, तर यौगिक जीवनशैलीच्या संपूर्ण क्षमतांचा शोध घेण्यासही मदत करेल आणि पारंपारिक व अस्सल योगपद्धतींचा अंगिकार करून त्या पूर्णत्वास नेण्यात अग्रेसर असलेल्या अनेक योग संस्थांची द्वारे त्यांच्यासाठी खुली करतील.
भारताच्या आयुष मंत्रालयाचे सेक्रेटरी, वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक सामूहिक चळवळ बनवण्याच्या दृष्टीने आयुष मंत्रालयसुद्धा अनेक नामांकित योगसंस्थांबरोबर सक्रियपणे भाग घेत आहे. हे मंत्रालय ‘योगा फॉर युनिटी अॅंड वेल बिइंग’ ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या श्री रामचंद्र मिशन तथा हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या 2021 च्या आंतरराष्ट्रीय योगदिनाशी संबंधित अत्यंत प्रमुख अशा या उपक्रमाला सहकार्य करीत आहे.
डॉक्टर एच. आर. नागेंद्र म्हणाले, “अस्सल पारंपारिक योगविद्यालयांना एकत्र आणून जागतिक स्तरावर परस्पर संबंधांचा अनुभव मिळवून देत असल्याबद्दल आम्ही श्री रामचंद्र मिशनचे आभारी आहोत. ही शंभर दिवसांची साधना सहभागींना एक सखोल अनुभव मिळवून देईल ज्यायोगे ते योग आणि ध्यानाला त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतील.
मागच्या महिन्यात हार्टफुलनेस साधनेच्या पंचाहत्तराव्या वर्धापनदिनाच्या समारोप समारंभात माननीय पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे विश्व अतिवेगवान जीवनाच्या परिणामस्वरूप निर्माण झालेल्या महामारी, नैराश्य आणि अगदी आतंकवादासारख्या अमंगल गोष्टींशी लढा देत आहे. अशा परिस्थितीत सहज मार्ग आणि हार्टफुलनेसचे उपक्रम योगाच्या बरोबरीने जगासाठी आशेच्या दीपस्तंभाचे काम करीत आहेत. ‘योगा फॉर युनिटी अँड वेल बिइंग’ हा कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय परस्परातील संबंधांचे अत्युच्च ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने टाकलेले हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे आणखी एक पाऊल आहे.
‘योगा फॉर युनिटी अँड वेल बिइंग’ मार्च 15 ते जून 21, 2021
या शृंखलेद्वारे हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आघाडीच्या पारंपारिक योग विद्यालयांना एकत्र आणून त्यांच्या साधनापद्धती एकाच मंचावरून उपलब्ध करून देत आहे. ही संपूर्ण शृंखला सहभागींसाठी विनामूल्य सादर केली जात आहे. यात विविध परंपरांमार्फत 75 पेक्षा जास्त योगासनांची सत्रे, योगतज्ञांनी दिलेली 30 हून अधिक व्याख्याने व सप्ताह अखेरीस दाजींनी संचालित केलेले मास्टर क्लासेस सादर केले जातील. यांची सुरुवात 15 मार्च रोजी होऊन पुढील शंभर दिवसांसाठी ती हार्टफुलनेसच्या यु ट्यूब आणि इतर सोशल मीडिया मंचांवरून उपलब्ध करून दिली जातील. सर्व सत्रांमधील विनामूल्य सहभागासाठी इच्छुक येथे नोंदणी करू शकतात : https://heartfulness.org/en/yoga4unity/
या उपक्रमाला आयुष मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघाचे भारत व भूतान माहिती केंद्र, ऐक्य आणि शांततेसाठी योग आणि भारतीय विश्वविद्यालय संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
श्री रामचंद्र मिशन ऊर्फ सहज मार्ग यांच्या छत्रछायेखाली हार्टफुलनेस जगभरातील 160 हून अधिक देशातील लाखो लोकांमध्ये पुरातन राजयोग ध्यानपद्धतीच्या आधुनिक स्वरूपाचा प्रसार करीत आहे. हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट पारंपारिक परंतु अप्रसिद्ध अशा योग संस्थांचा जागतिक श्रोत्यांशी संपर्क स्थापित करून योगाच्या पद्धती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या सत्रांचे आयोजन करीत आहे.