ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार टीकास्त्र
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) चिरंजीव , युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल देखील फडणवीसांनी केला.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे जीआर मागे घेतल्यानंतर, ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसंच सरकारच्या समितीला न जुमानण्याची भाषा दोन्ही ठाकरेंनी केली. मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे. रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार घणाघात केला. त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला, याचा देवेंद्र फडणवीसांनी पुनरूच्चार केला.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज पाहणी करणार
५ जुलैच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून वरळी NSCI डोम येथे पाहणी केली जाणार आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून संयुक्त पद्धतीने विजयी जल्लोष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आयोजनाची पाहणी करणार आहेत.
हिंदीविरोधाचा धाग्यानं ठाकरे बंधूंना आणलं एकत्र
सध्या महाराष्ट्राचं खासकरून मुंबईकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का? हिंदीविरोधाचा धाग्यानं ठाकरे बंधूंना एकत्र आणलं. ५ तारखेच्या मेळाव्यात या एकीचा आवाज महाराष्ट्रात घुमणार आहे. त्यानंतरही या बंधूंच्या एकीची वज्रमूठ टिकणार का, हा प्रश्न विचारला जातोय. ५ तारखेला ठाकरे बंधू एकत्र दिसणार असले तरी २००६ मध्ये ताटातूट झाल्यापासून ते अनेकदा एकत्र आलेत. पण मनोमिलन मात्र झालं नाही.
ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्याची सुरुवात ५ जुलैला सकाळी १० वाजता होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून विजयी मेळावा कुठे घ्यायचा, किती वाजता घ्यायचा, याबाबत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये चर्चा सुरु होती. आज शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून विजयी मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. परंतु या मेळाव्याची वेळ मात्र सांगितली नव्हती. परंतु आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र पत्र काढत विजयी मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ सांगितली आहे.
ठाकरे बंधूंचं आवाहन
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक संयुक्त पत्रक काढत सर्वांना आव्हान केलं आहे. आवाज मराठीचा…असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं…आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे.
संजय राऊतांचे थेट नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंना निमंत्रण
संजय राऊत यांनी या विजयी मेळाव्याचं निमंत्रण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत दिले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड…यावे जागराला यावे…, असंही संजय राऊतांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.





