अपूर्व हिरेंचा आज भाजपप्रवेश, त्यापूर्वीच पोलिसांत फसवणूक केल्याबद्दल तक्रार
अपूर्व हिरे यांनी सर्व आरोप फेटाळले
नाशिक : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि डॉ. अपूर्व हिरे यांच्यातील कुरघोडीचे राजकारण संपण्याची चिन्हे नाहीत. या राजकारणाला कंटाळून अपूर्व हिरे आज भाजप प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांनी श्री व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असताना महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नावे लाखो रुपयांचे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप करण्यात आला.
फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये अपूर्व हिरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या संस्थेतील शिक्षकांची दिशाभूल करून शिक्षकांच्या नावे काढलेल्या कर्ज रकमेची स्वतः च्या खात्यावर वर्ग करून लाखो रुपयाचा अपहार केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
संबंधित कर्ज विविध कर्मचाऱ्यांच्या नावाने घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हे कर्ज हिरे कुटुंबीयांनी स्वतःसाठी घेतले असल्याचा दावा शिक्षक पवार यांनी केला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याचा दावा आहे.
दरम्यान, अपूर्व हिरे यांनी सर्व आरोप फेटाळले असून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे माझ्याविरोधात विरोधकांचे कारस्थान आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या भीतीपोटी हे कट कारस्थान रचले गेले आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे सांगत या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याचे अपूर्व हिरे यांचे म्हणणे आहे.





