
ठाणे (प्रतिनिधी) : भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धोकादायक इमारतींबाबत कोणत्याही क्षणी दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता आणि नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना धोकादायक इमारतींबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता तात्काळ प्रतिबंधात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांनी सर्व धोकादायक इमारतींची तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या सद्यस्थितीची खातरजमा करावी. अतिधोकादायक (c-१) व तत्सम इमारती तात्काळ पूर्णतः निर्मनुष्य करून संबंधित रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. धोकादायक इमारतींचा वीज व पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात यावा. नियमानुसार या धोकादायक इमारतींचे तातडीने निष्कासन करावे. ज्या इमारतींचे संरचनात्मक अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट) प्राप्त झाले असून दुरुस्तीची शिफारस करण्यात आलेली आहे, अशा इमारतींना नियमानुसार तत्काळ दुरुस्तीची परवानगी देऊन संबंधित कामावर प्रभावी देखरेख ठेवण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले.
ज्या इमारतींना दुरुस्तीस परवानगी दिली आहे अशा प्रत्येक इमारतीची परवानगी प्रत, स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल, काम सुरू असल्याची दिनांकवार छायाचित्रे, स्थळपाहणी अहवाल व इतर संबंधित कागदपत्रे यांचा संपूर्ण संच शहर विकास विभाग तसेच उपायुक्त विक्रम दराडे यांच्याकडे तात्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. धोकादायक इमारतींवरील करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यवाहीचा छायाचित्रांसह दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निदे्रश आयुक्तांनी दिले.
आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, धोकादायक इमारतींबाबत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे, कार्यवाहीत विलंब करणे अथवा हलगर्जीपणा करणे यामुळे कोणतीही दुर्घटना, इमारत कोसळणे, अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना पूर्णपणे जबाबदार धरून संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
सदर बैठकीस उपायुक्त (अन. बांधकाम) विक्रम दराडे, सहायक आयुक्त (अन. बांधकाम) फैसल तातली, सहायक आयुक्त मकसुम शेख, विनोद मनोरे, नितेश चौधरी, अरविंद घुगरे, गिरीष घोष्टेकर, शहर विकास विभाग प्रमुख समीर जवरे आदी उपस्थित होते.




