
ठाणे (प्रतिनिधी) : महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत सहा मसाला गिरण्या अखेर बंद झाल्याने येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. याबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा करताना अधिवेशनातही आवाज उठवला होता.
भाजपच्या खोपट येथे झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या ११२व्या कार्यक्रमात संबंधित व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. महात्मा फुले भाजी मंडईत सुमारे ५०० गाळेधारक आहेत. या मंडईत अनधिकृतपणे सहा मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्या. यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी आ. केळकर यांच्याकडे धाव घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. श्री. केळकर यांनी महापालिका स्तरावर अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी त्या गिरण्या बंद करण्याचे आदेश दिले. या गिरण्या बंद होऊन पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी आणि नागरिकांनी मुख्यालयासमोर आंदोलनही केले होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात श्री.केळकर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून या मसाला गिरण्या बंद करण्यात आल्या. यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून त्यांनी आ. केळकर यांचे आभार मानले.
फसवणूक करणाऱ्या विकासकांबाबत माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी सांगितले की कशेळी येथे शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी स्वस्तातील घरे घेण्यासाठी लाखो रुपये विकासकाला दिले, मात्र इमारतही उभी राहिली नाही आणि विकासकही गायब झाल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. शहरात जमिनी बळकावण्याचे आणि विकासकांकडून नागरीकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून याबाबत आगामी अधिवेशनात एमपीआयडी अंतर्गत अशा प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी खासगी बिल मांडणार असल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली.
या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, अमित सरय्या, माधुरी मेटांगे, नगरसेविका अनिता यादव, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.




