
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बेवारस वाहने उभी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचे मालक गेल्या अनेक महिन्यांपासून सदर वाहनांकडे फिरकतही नाहीत. ही वाहने पोलिसांच्या मदतीने जप्त करावीत, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन केली.
शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगारजमा झालेली वाहने उभी करण्यात आली आहेत. या वाहनांचे मालक आपल्या वाहनांकडे फिरकतही नाहीत. या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. ही वाहने भंगार जमा असल्याने त्याच्या आजूबाजूला लोक कचरा फेकत आहेत. त्यामुळे जिथे ही बेवारस वाहने आहेत. तिथे कचऱ्याचे ढीग लागत आहेत. परिणामी, पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा असल्याने वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहे. शिवाय, या वाहनांच्या आड बसून अंमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याने गुन्हेगारी वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागात एकाच जागेवर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
दरम्यान, ही वाहने उभी करून जाणाऱ्या वाहनमालकांचा शोध घेऊन पार्किंग दरानुसार दंडवसुली करावी, ही वाहने भंगारात विकावित. या कार्यवाहीसाठी ठामपाला कोणतीही नवीन आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. मात्र, ठाणेकरांना वाहतूक कोंडी, रोगराई यापासून मोकळा श्वास घेता येईल. या मोहिमेची सुरूवात दिवा, मुंब्रा येथून करावी, अशीही मागणी शानू पठाण यांनी केली. आयुक्तांनीही या मागणीच्या परिपूर्ततेसाठी सकारात्मकता दाखविली.




