बेतवडे येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन
...परप्रांतीय भू-माफिया बिल्डरांच्या मुसक्या आवळल्याशिवाय लढाई थांबणार नाही; शिवसेनेचा इशारा

दिवा (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील बेतवडे गावातील ३५ ते ४० भूमिपुत्र आणि शेतकरी बांधवांची ‘मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड’ कंपनीचे बिल्डर मयूर रमणिकलाल शहा, सागर गाला व त्यांच्या भागीदारांनी गेल्या १० वर्षांपासून चालवलेली फसवणूक अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. जमीन विकास करारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला न देणे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारती बांधून त्यांची विक्री करणे आणि शेतकऱ्यांना केवळ खोटे वायदे देऊन त्यांची दिशाभूल करणे, हा सरळ सरळ अन्याय आहे. या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून तीव्र लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ पासून मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड बिल्डरच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या ‘बेमुदत धरणे आंदोलनाला’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर आणि सक्रिय समर्थन दिले आहे.
आपल्याच हक्काच्या जमिनीसाठी आणि न्यायासाठी शेतकऱ्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात दाद मागावी लागत आहे, परंतु तिथेही पोलीस प्रशासन बिल्डरांना पाठीशी घालत असून शेतकऱ्यांना दमदाटी केली जात आहे, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या भू-माफियांसमोर हतबल झाले असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख मागण्या:
१. बिल्डर मयूर शहा, सागर गाला व भागीदारांवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई व्हावी.
२. शेतकऱ्यांना रजिस्टर करारात ठरलेला मोबदला नुकसान भरपाईसह त्वरित देण्यात यावा.
३. शेतकऱ्यांचा पूर्ण मोबदला मिळेपर्यंत मॅरेथॉन कंपनीचे इमारतींचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे.
४. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बांधलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री तात्काळ थांबवून सर्वसामान्य घर घेणाऱ्यांची फसवणूक थांबवावी.
बेतवडे गावातील भूमिपुत्रांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे उभा आहे. या परप्रांतीय मुजोर भू-माफिया बिल्डरांच्या मुसक्या आवळल्याशिवाय आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक या आंदोलनात ताकदीने शेतकऱ्यांच्या सोबत मैदानावर उतरले आहेत. ह्यावेळी उपजिल्हा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, विकास इंगळे वंचित बहुजन आघाडी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख, मिलिंद गवई दिवा विभाग प्रमुख, नितेश इंगोले,गणेश पवार व्यापारी संघटना अध्यक्ष, डॉक्टर देवेंद्र कांबळे, रुपेश कांबळे, नितीन अहिरे, राहुल जोगदंड, अमोल केंद्रे समाजसेवक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते




