Top Newsराजकारण

शरद पवार इन अ‍ॅक्शन; दिल्लीत मोर्चेबांधणी, सोनिया गांधी, संजय राऊत आदींच्या उपस्थितीत उद्या पुन्हा चर्चा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अस्तित्वावरुन जोरदार चर्चा झडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचा काँग्रेस विरोध शिवसेनेला मान्य नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत अजून एक मोठी बैठक पार पडली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथवरील निवासस्थानी पार पडेलल्या या बैठकीला स्वत: सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी, शिवसेना खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी पवारांसमोरच राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच यूपीए कुठे आहे? असा सवालही केला होता. बॅनर्जींच्या या बैठकीनंतर यूपीएबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर आज झालेल्या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, आजची बैठक ही पूर्वनियोजित होती. ही बैठक बंद दाराआड होती. राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी अनेक गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत. पुढे काय करता येईल, काय रणनिती ठरवता येईल, याबाबत आम्ही बोललो. शिवसेनेच्या वतीनं मी उपस्थित होतो. खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. उद्धवजींनी यावं असा त्यांचा आग्रह होता. पण उद्धवजी सध्या प्रवास करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी मला जाण्यास सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थित आज दिल्लीत बैठक पार पडली. त्यात राजकीय विषांवर चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या पुन्हा एकदा विरोधकांची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे भाजपविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा तयारीत यूपीए असल्याचं पाहायला मिळत आहे.

ममतांच्या भेटीनंतर पवार-सोनिया पहिली भेट

सध्या दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण सोनिया गांधींची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या बैठकीला संजय राऊतही उपस्थित होते. तसेच फारूक अब्दुल्ला आणि मल्लिकार्जुन खर्गेही बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा राजकीय हलचाली वाढल्याचं पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच पवार आणि सोनिया गांधीची भेट झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, त्यावेळी त्या शरद पावरांना भेटल्या होत्या. त्या भेटीनंतर राज्यातले राजकारण जोरादार तापले होते, कारण ममता बॅनर्जी यांनी राहुल गाधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते.

बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण होते

आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होतं, मात्र ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. अशी प्रतिक्रिया बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे या बंद दाराआडच्या बैठकीतली चर्चा गुलदस्त्यात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button