Top Newsराजकारण

फडणवीसांच्या व्हीडिओ हल्ल्यानंतर सरकारकडून सावध प्रतिक्रिया; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हीडिओ अटॅक करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हीडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जातेय. तसंच फडणवीसांनी दिलेले सर्व व्हीडिओ तपासूनच त्यावर उद्या सविस्तर बोलेन असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय.

व्हीडिओची सत्यता पडतळावी लागेल : वळसे पाटील

देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप करत एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासाचं फुटेज असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. फडणवीसांच्या या आरोपांबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन. व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही सावध प्रतिक्रिया देत फडणवीसांनी नेमके काय आरोप केले हे तपासले पाहिजे. सरकारची काम करण्याची पद्धत चुकीची नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत अधिक घोषणा करतील, असं देसाई म्हणाले.

पेगासस देखील एवढं करणार नाही : भुजबळ

छगन भुजबळ यांनीही फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पवार साहेब कुणाबाबत असं भाष्य करणं शक्य नाही. १३० तासांचे व्हीडिओ काढले आहेत, तर हे सर्व तपासलं जाईल. सत्य बाहेर येईलच. त्या पुराव्यांवर मला अजिबात विश्वास नाही. पेगासस देखील एवढं करणार नाही. एक तास ठीक आहे पण एवढे तास! ते जे सांगत आहेत ते खरं आहे हे कशावरुन? सरकार तपास करेल. व्हीडिओ काढले आणि नंतर त्यात दुसरंच काही भाषण टाकलं तर? असा सवाल भुजबळ यांनी विचारलाय.

यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची : पटोले

नाना पटोले यांनीही फडणवीसांच्या आरोपांबाबत खोचक टीका केलीय. जे काही व्हीडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे. त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपिग केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणवीस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

जे काही व्हीडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. भाजपवर प्रत्यारोप करताना, फडणवीसांच्या आरोपांना उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील, या व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओची डबिंग झालेली असू शकते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

अधिकाऱ्यांचा आरोपांवर बोलण्यास नकार

तसेच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, घरचे सिसीटीव्ही फुटेज कसे बाहेर आले? हे देखील तपासले पाहिजे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या विधानाबाबत विचारले असता, जर दाऊदसोबत व्यव्हार झाला असेल तर नवाब मलिकांचा राजिनामा घेतलाच पाहिजे, याबाबत दुमत नाही, असे पुनरोच्चार त्यांनी केला आहे. विघातक शक्तींसोबत जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र, इकबाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई केली का जाऊ नये? असा सवालही त्यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेल्या महिला पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण यांचा या प्रकरणात बोलण्यास नकार दिला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. मी आताचं काही स्पष्टीकरण देणार नाही. वरीष्ठ अधिकारी डीसीपी याॉसंदर्भात स्पष्टीकरण देतील, असे त्यांनी सांगितले आहे.

व्हीडिओतील फेरफार बाहेर येईल, विशेष सरकारी वकिलांची प्रतिक्रिया

राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी, ‘व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल’, असं सांगत फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.

फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हीडिओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हीडिओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभाग तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय.

‘म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही? : अनिल गोटे

फडणवीसांनी केलेले सगळे आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी फेटाळून लावले आहेत. फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचं म्हटलय. म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का? असा सवालही उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे, असा आरोप गोटे यांनी केला आहे. वकील प्रवीण चव्हाण यांनी अनिल गोटेंना फोन केला होता, असा आरोप फडणवीस यांना केला आहे. त्यावरुनही अनिल गोटे यांना आव्हान देत फडणवीसांनी हे आरोप सिद्ध करावेत, असं म्हटलंय. दरम्यान, केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा सुरु आहे, हे देखील यावरुन समोर आलं असल्याची टीका गोटे यांनी केली आहे.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर गोटे यांनी म्हटलं आहे की, माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असं फडणवीसांनी म्हटलंय. माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं.

रेकॉर्डिग केल्याच्या बाबीवरुनही अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेले फोन टॅपिंगचा आरोपांचा हवाला देत गोटे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीस यांनी तो फोन अनिल गोटेंना करण्यात आला असल्याचा दावा केला होता. त्यावरुन गोटे यांनी सर्व आरोप फेटाळू लावले आहेत. तसंच खासगीत आता आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही? असाही सवालही उपस्थित केला आहे.

फडणवीसांचे आरोप

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहेत. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी केला केला. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहेत.

सुमारे १२५ तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केलाय. भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोप यावेळी फडणवीसांकडून करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर होते, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राज्याचं राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. २०२१ मध्ये असा गुन्हा दाखल केला की २०१८ मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्रे गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button