राजकारण

शिवसेना नेत्यांच्या ३ निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

राहुल कनाल, संजय कदम, बजरंग खरमाटे यांच्या घरी छापे

मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचे धाड सत्र सुरु असतानाच आता आणखी काही शिवसेना नेते आयटीच्या रडारवर आले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, युवासेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आज सकाळी आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि छापेमारी सुरु केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीमधील निवासस्थानी ही छापेमारी सुरु आहे. तर मुंबईपाठोपाठ पुण्यातही आयकर विभागाचे धाड सत्र सुरु केले आहे.

मात्र या छापेमारीदरम्यान राहुल कनाल घरी होते की नाही याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच हे धाडसत्र किती दिवस आणि किती वेळ चालणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच कोणत्या प्रकरणासंबंधीत हे धाडसत्र सुरु आहे याची माहिती देखील स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या पाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावरही आयकर विभागाने आज धाडसत्र सुरु केले आहे. सकाळपासून आयकर विभागाकडून कदम यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरु आहे. संजय कदम अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतीत १६ व्या मजल्यावर राहतात. कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय असून ते पेशाने केबल व्यावसायिक आहेत. यापाठोपाठ पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयकर विभागाने छापेमारी सुरु केल्याची सूत्रांची माहिती आहे.

आयकर विभागाने एकाच दिवशी शिवसेनेशी संबंधीत तीन वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी छापेमारी केल्याने शिवसेनेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेना खासदार संजय राऊत तपास यंत्रणांच्या या धाडसत्रावर शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे संजय राऊत या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button