Top Newsराजकारण

टिपू सुलतान प्रकरणावरुन भाजपकडून जनतेची दिशाभूल; नवाब मलिकांची टीका

मलिक हिंदूद्वेष्टे आहेत : दरेकर

मुंबई : मुंबईत सध्या टिपू सुलतान नावावरून जोरदार राजकारण तापले आहे. मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या संकुलाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजपा लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती, ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते, त्यांचा नावाचा विरोध करण्याचे काम भाजप करत आहे. तसेच, कर्नाटकामध्येही भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

याचबरोबर, याआधी २०१३ मध्ये भाजप नगरसेवकांनी अशाचप्रकारे टिपू सुलतान यांचे नाव देण्याची भूमिका घेतली होती, ही बाबही नवाब मलिक यांनी निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले, मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांनी टिपू सुलतान यांच्या नामकरणासाठी पत्र दिले होते. एखाद्या मैदानचे नाव टिपू सुलतान यांच्या नावाने झाले तर ते घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करत आहे. याबाबतीत राष्ट्रपतींनीही संसदेत सभागृहाला संबोधित करत असताना टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल दिलेली माहिती भाजपच्या नेत्यांनी घेतली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यात दंगली घडवण्याचा भाजपचा डाव : अतुल लोंढे

भाजप नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकावू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात लोंढे म्हणाले की, टिपू सुलतान नावावरून भारतीय जनता पक्ष धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पहात आहे. जीवघेणी महागाई, बरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यावर केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरले असून या मुख्य मुद्द्यांना बगल देऊन पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजपा राजकारण करत आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या विषयावरून वातावरण पेटवून त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याचे हे षडयंत्र आहे परंतु भाजपाने धार्मिक मुद्दे सोडून निवडणुका लढवून दाखवाव्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षात सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी टिपू सुलतानच्या नावावरून धार्मिक द्वेष पसरवून अशांतता पसरवण्याचा भाजपा प्रयत्न दिसत आहे.

टिपू सुलतानबद्दल कोणाला जास्त प्रेम आहे हे राज्यातील भाजप नेत्यांनी कर्नाटकातील त्यांच्या नेत्यांकडून माहिती घ्यावी. कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव करण्यात आला त्यावेळी भाजपचेच सरकार होते. त्यामुळे आधी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी अभ्यास करावा व नंतर बोलावे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, येथे भडकावू विधाने करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार त्याची गंभीर दखल घेईल, असेही लोंढे म्हणाले.

मलिक हिंदूद्वेष्टे आहेत : दरेकर

मलिक हे मुस्लिम समाजाचेच आहेत. ते हिंदुद्वेष्ट्ये आहेत. त्यामुळे मलिक यांच्याकडून वेगळी अपेक्षाच नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर थेट वार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button