इतर

शिर्डीचे साई मंदिर ५ ते ३० एप्रिल दरम्यान दर्शनासाठी बंद

शिर्डी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या “ब्रेक दि चेन” या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणा-या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोवीड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांच्य प्रमुखांची उपस्थिती होती.

साईसंस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिस-यांदा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. १९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले. तसेच शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले. यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० रोजी दुपारी तीन वाजेपासून १५ नोव्हेंबर २०२० रात्री पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले. १६ नोव्हेंबरला मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतरही २३ फेब्रुवारी २०२१ पासून दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्ताविना होवू लागली. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून २८ मार्च २०२१ पासुन वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ करण्यात आली. यानंतर आज, सोमवारी रात्री आठपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मंदिर काही दिवसांसाठी बंद होणार असल्याने शिर्डीकरांनी दर्शनासाठी मंदिराकडे धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button