Top Newsआरोग्य

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे मुंबईकरांची चिंता वाढली

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस... सर्व निरुपयोगी !

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे मुंबईचीही चिंता वाढली आहे. त्याची खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा विचार पालिका करत आहे. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिअंटमुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतेही मागणी नाही, असं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे. दरम्यान, दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवीन व्हेरिअंट जगात पुन्हा हाहाकार माजविण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने या व्हेरिअंटला खूप वेगाने पसरणारे चिंताजनक स्वरुप असे म्हटले आहे. या व्हेरिअंटला ग्रीकमध्ये ‘ओमीक्रॉन’ नाव देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांनंतर ही पहिल्यांदा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वर्गीकरणाची घोषणा केली आहे.

परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच, या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली आहे.

सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरिअंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर असणार आहे. आज संध्याकाळी साडे पाच वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेतील. या बैठकील सर्व कोव्हिड हॉस्पिटलचे डिन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक : टोपे

कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट काळजी करण्यासारखा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय विमानांवर निर्बंध लादण्यासाठी विनंती केली आहे. तर आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तासांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. देशात सध्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण सापडला नाही. परंतु ओमिक्रोन कोविड व्हेरियंटपासून खबरदारी म्हणून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहेत. त्यांचा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे राज्य सरकार निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या व्हेरियंटबाबत माहिती दिली आहे. सध्या देशात डेल्टाचे रुग्ण असून ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण सापडला नाही आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून नव्या व्हेरियंटबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच हा विषाणू धोकादायक असल्याचेही सांगितले आहे. आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे. विमानतळावर आलेल्या प्रवाशांची स्वॅब टेस्ट करण्यात येत आहे. तसेच क्वारंटाईन करण्यात येत आहे. देशात आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्या विमानांवर बंधने घालावीत अशी विनंती राज्य सरकारकडून केंद्राला करण्यात आली असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

निर्बंधाबाबत मुख्यमंत्री बैठक घेणार

राज्यात कोरोना निर्बंधाबाबत विचारण्यात आल्यावर अजित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या ओमिक्रॉन व्हायरसबाबतही अजित पवारांनी खुलासा केला. या व्हायरसबाबत तज्ज्ञांनी वेगवेगळे मत मांडले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतरच याबाबतची पुढील दिशा ठरेल असेही ते म्हणाले.

जागतिक पातळीवर असणारी कोरोना व्हायरसची स्थिती पाहता केंद्राच्या निर्णयावर आम्ही अवलंबून आहोत. नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आरोग्य विभाग जो निर्णय घेणार तो अंमलात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी केंद्राच्या सूचनेनुसारच जी नियमावली असेल ती अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस… सर्व निरुपयोगी

कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. यामुळे वेगाने पसरणारा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट सापडल्याने हा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओमीक्रॉनमुळे अनेक देशांना प्रभावित क्षेत्रातून प्रवासावर बंदी आणण्याची आवश्यकता भासली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये देखील जोरदार घसरण झाली आहे.

कोरोनाचा बी.१.१.५२९ व्हेरिअंट सापडल्याची घोषणा गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी केली होती. आता हा व्हेरिअंट अन्य दोन देश इस्त्रायल आणि बेल्जिअममध्येही सापडला आहे. हाँगकाँगमध्येही एक रुग्ण सापडला आहे. डब्ल्यूएचओनुसार आतापर्यंत या व्हेरिअंटच्या जवळपास १०० जीनोम सिक्वेंन्सिंगची सूचना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटची लागण झालेल्या अनेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते. त्याहून धक्कादायक म्हणजे इस्त्रायलच्या ज्या व्यक्तीला नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे त्याला बुस्टर डोसही मिळाला होता.

भारताने शुक्रवारी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे नियमित सुरु करण्याची घोषणा केली आहे. परंतू नवा कोरोना व्हेरिअंट डेल्टा किंवा आधीच्या कोरोना विषाणूंपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना लस घेतलेले लोकही या व्हेरिअंटने बाधित होणार आहेत. यामुळे कोरोना लसीच्या प्रभावावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button