सातत्याने वकिलांसाठी क्रिकेटचे सामने घेणे सोपे नाही. अॅड. जगदाळेंनी हे करून दाखवले आहे. त्यांच्या डेडिकेशनला माझा सलाम. मी अनुभवाने असे म्हणू शकतो की, खेळांडूकडून ‘एन्ट्री फी’ घेतली म्हणजे सगळं काही निभावत येतं, असे होत नाही. खेळाडूंच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेपासून विविध मैदानांचे आरक्षण, आदी गोष्टी वेळेत आणि सुनियोजितपणे होणे अत्यंत कसरतीचे काम आहे आणि यासाठी बहुतेकवेळा निधीची उभारणी व्यक्तिगत पातळीवर करावी लागते. मी स्वत: नाशिक वकील संघाचा सहा वर्षे कॅप्टन होतो. त्या काळातही मी पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, ठाणे अशा अनेक शहरांत स्पर्धेसाठी गेलो होतो. त्यावेळी जे टीम स्पिरिट होते, त्यात आज थोडीफार जाणवत आहे. कधीतरी टीममधील अंतर्गत वाद, हेवेदावे मैदानातच उफाळून येतात किंवा दोन संघांमधील वकील खेळांडूमधला सलोखा कमी पडतो आणि एकमेकांना अपशब्द वापरण्याच्या घटनाही घडतात. असे प्रकार आणि असे वर्तन वकिलांकडून होणार नाही याची दक्षता प्रत्येक वकिलाने घ्यायलाच हवी. हल्ली खेळात असो किंवा वकिलीत व्यावसायिकता, स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे संयम कमी होत चालला आहे. वकिलांनी मैदानातच नाही तर न्यायालयीन कामकाजातही सांघिकता जपण्याची आवश्यकता आहे. खेळात हार-जीत होतच असते. ती पचवता आली पाहिजे. एखाद्या स्पर्धेत आपण भाग घेतो, तिथेच आपण जिंकलेलो असतो. मात्र मी हारलो, तू जिंकलास अशी मनोवृत्ती राहिली तर खेळाचा निर्भेळ आनंद घेता येणार नाही. अशाने भावनिक कटुता वाढत चालली आहे. माझे यानिमित्ताने सर्वच वकील खेळांडूना एक आवाहन आहे, हा ‘गेम ऑफ लक’ आहे. खेळाडू उत्कृष्ट असतात, मात्र अनेकदा नशीब सोबत नसते… मग बॉलिंग नीट पडत नाही… बॅटींग योग्य होत नाही… फिल्डींग कमी पडते… पण म्हणून त्याचा त्रागा न करता जिंकायचेच या जिद्दीने प्रयत्न करणे हेच खिलाडूवृत्तीचे लक्षण आहे. खेळात तेढ निर्माण न करता सांघिकता जपत जगदाळेंनी वकिलांच्या क्रिकेटला एका ऊंचीवर नेले आहे. आज महाराष्ट्रात होणाऱ्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धांसाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थिती दर्शवितात ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या जगदाळेंना सदिच्छा आहेत.
मी गत ३८-३९ वर्षे वकिली व्यवसायात आहे. या अनुभवाने नवोदित वकिलांना आणि वकील खेळाडूना सांगू इच्छितो की, प्रत्येक प्रोफेशनमध्ये वेटींग पिरियड असतो. वकिलीमध्ये हा काळ सात ते आठ वर्षांचा आहे. हे मी आज सांगत नाही, तर गत १०० वर्षांपासून ज्येष्ठ वकील मंडळींनी हे सांगून ठेवले आहे. त्यामुळे नवोदित वकिलांनी संयमाने हे गृहित धरले पाहिजे. जागतिकीकरणामुळे वकिलांना अनेक संधी आणि पर्याय उपलब्ध आहेत. फक्त फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक न्यायालय एवढीच पारंपरिक दालने न राहता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र नवोदित वकिलांसमोरील जबाबदाºया, स्पर्धा यामुळे झटपट स्थिरावण्याच्या नादात, आज माझी काहीच कमाई नाही, मात्र माझा सहकारी कमावतो आहे, या मानसिकतेतून निर्माण झालेल्या नैराश्येतून, इर्ष्येतून अभ्यासाकडे, वाचनाकडे दुर्लक्ष होते. आपसुखच ज्ञानप्राप्तीचा वेग कमी होतो, नवे शिकण्याची जाणून घेण्याची जिज्ञासा वकिलांमध्ये कायम असली पाहिजे. आपल्या नावावर पक्षकार मिळवायचे असतील तर वेळ द्यावा लागेल, अभ्यास हा करावाच लागेल.
येत्या काही दिवसांत वकील सुरक्षा कायद्याचे संरक्षणही वकिलांना मिळेल. वकील सुरक्षा कायद्याचा मसुदाही तयार आहे. हा कायदा अस्तित्वात येण्याची आणि त्याची सक्त अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. याबरोबरीनेच प्रत्येक राज्य व जिल्हा, तालुका वकील संघाला राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या बजेटमध्ये भरीव आर्थिक तरतूद व्हावी अशी माझी सातत्याने मागणी आहे. इतर अनेक राज्यांनी ज्या प्रकारे नवोदित वकिलांना तीन ते पाच वर्षांकरता मानधन देण्याची योजना सुरु केली. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य शासनाने दक्ष राहून असा निधी उपलब्ध करून दिल्यास सर्व नवोदितांना आर्थिक दिलासा मिळू शकेल. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनानुसार राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञांनी पुढे येत नवोदीतांना प्रशिक्षण देण्यासाठी योगदान द्यावे. फक्त खेळासाठीच नाही तर वकिलांसाठी आवश्यक असणाऱ्या न्यायालयीन कामकाजात अधिक सुसुत्रता येण्यासाठी तसेच वकिलांमधील गुणात्मकता वाढविण्यासाठी आता सांघिक भावनेने एकत्रित येण्याची गरज आहे.