Top Newsस्पोर्ट्स

बार आणि बेंचमध्ये सुसंवाद वाढावा

- अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन

 

– अ‍ॅड. नितीन ठाकरे

अ‍ॅड. विवेकानंद जगदाळेंना क्रिकेटची आवड आहे. त्यांनी ती वकिली व्यवसायासोबत चांगली जपली आहे. सातत्याने इतक्या मोठ्या संख्येने खेळाडूंना एकत्रित करण्याची त्यांची क्षमता आहे आणि हे कौतुकास्पद आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आणि सहकार्यच आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे की जो कोणत्याही वयोगटाचा आवडता खेळ आहे. वकिलांनी आपल्या व्यवसायातील ताण पाहता फिटनेस सांभाळणे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ स्पर्धा आहे म्हणून चार दिवस खेळायचे अन् मैदानात गेल्यावर आपल्या फिटनेसची फजिती अनुभवायची असे व्हायला नको. जगाचे कल्याण करताना आपल्या तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष नको.

नाशिकमध्ये आयोजित केलेल्या यंदाच्या ‘एमएपीएल’च्या चौथ्या पर्वामध्ये अ‍ॅड. जगदाळेंनी बार आणि बेंचमध्ये मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन केले आहे. यामुळे बार आणि बेंचमधील सुसंवाद वाढण्यास मदत होईल. असाच सुसंवाद या स्पर्धेमुळे वकिलामंध्येही वाढवावा. वकिलांमध्ये सांघिक भावना, बंधूभाव निर्माण होण्याची गरज आहे. ती या स्पर्धेच्या माध्यमातून सुकर होईल. पराजय पचविण्याची आणि जिंकण्याचा आनंद घेण्याची क्षमता जोपासली पाहिजे. कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार हे खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे. महाराष्ट्रातील वकिलांनी फक्त क्रिकेटच नाही तर सर्वच खेळात सहभाग नोंदवला पाहिजे. व्यायाम आणि खेळ यासाठी वेळ नाही ही सबब योग्य नाही. स्वत:च्या फिटनेससाठी प्रत्येकाने आग्रही असले पाहिजे.

आम्ही नाशिक बारच्या काही सदस्यांनी सायकल क्लब सुरु केला होता. आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करायचा अशी संकल्पना होती. दुर्दैवाने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नाशिक बारच्या सदस्यांनी असे काही स्तुत्य उपक्रम राबवले तर बार असोसिएशनचे कायमच सहकार्य असेल. भविष्यात नाशिक बारच्या वतीने वा महिला-पुरुष वकिलांनी स्वतंत्रपणे अशा काही स्पर्धांचे आयोजन केले तर नाशिक बारच्या वतीने मैदान आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. मात्र त्यासाठी वकिलांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. नाशिक बारच्या माध्यमातून नाशिक न्यायालयात उपलब्ध असणाºया ई लायब्ररी, पुस्तकांचा, जनरल्सचा वकिलांनी अधिकाधिक वापर करून घ्यावा. सांघिक खेळामुळे टीम वर्क वाढेल. अ‍ॅड. जगदाळेंनी यंदाच्या ‘एमएपीएल’चे उत्तम नियोजन करून खेळाला ग्लॅमर मिळवून दिले आहे. शिवाय बार-बेंचमध्ये होणाऱ्या फ्रेंडली मॅचमुळे एकप्रकारचे पूरक वातावरण निर्माण होणार आहे. नाशिकमध्ये जवळपास चार हजार वकील कार्यरत आहेत. त्या सगळ्यांंपर्यंत अध्यक्ष या नात्याने मला पोहोचता येत नाही. अशा स्पर्धांमुळे ते शक्य होते. खेळाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही मोठ्या प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button