

विवेकानंदने मातीची आणि शेतीची ताळ तुटू दिलेली नाही. व्यवसायासोबतच घर आणि आपली क्रिकेटची आवड याची सांगड घालताना त्याने घेतलेली झेप पाहता तो कर्तृत्ववान पोरगा आहे असं मला आवर्जुन सांगावसं वाटेल. महाराष्ट्रातील वकिलांना सातत्याने २५ -३० वर्षे क्रिकेटच्या मैदानात एकसंघ ठेवायचे, नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्टÑातील वकिलांना एकत्रित करण्याचे काम विवेकानंदने केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने वकिलांना एकत्रित करायचे, त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची कोणतीही आबाळ होणार नाही, याची काळजी घ्यायची. या सर्व सुविधा प्रसंगी स्वत:च्या खिशातून खर्च करून पुरवायच्या हे खरेतर शिवधनुष्यच आहे. विवेकने हे शिवधनुष्य पेलले आहे. यापूर्वीही अनेक वकील क्रिकेट खेळत होते, स्पर्धाही भरवत होते. पण विवेकानंदने क्रिकेटला ज्या उंचीवर नेले आहे, ते कोणालाही जमले नाही. त्याच्या या धडपडीचे, कर्तबगारीचे कौतुक आहे. त्याचे वडीलही माझे परिचित होते. ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते होते. मी आणि माझे मित्र अॅड. मनोहर साठे विवेकच्या लग्नाला उपस्थित होतो. विवेकचे हे क्रिकेटचे वेड आणि त्यासाठी त्याने स्वतंत्रपणे केलेले काम कौतुकास्पद आहे. तो हे सगळे एकट्यानेच करतो हे महत्वाचे आहे. त्याने घेतलेली झेप मोठी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आहे. त्याचा मुलगा कृष्णाही उत्तम खेळाडू आहे. मुली वेदांती आणि तुळजा दोघीही उच्चशिक्षित आहेत. पत्नी आपल्याच कोर्टाचा घटक आहे. वडिलांचे नाव त्याने मोठे केले आहे. सर्वसामान्य घरातला, अत्यंत कर्तबगार असा हा धडपड्या मुलगा आहे. माझ्या त्याला सदिच्छा आहेतच.
खेडेगावातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने माणसे जोडून ठेवली आहेत. त्याचे आजचे यश हे तोंडात बोटे घालावीत इतके मोठे आहे. त्याच्या क्रिकेट प्रेमाला दाद द्यावी असेच त्याचे जगणे आहे. वकिली व्यवसायातही तो चांगलाच स्थिरावला आहे. आमच्यासाठी ग्रामीण भागातल्या एका मुलाने मिळवलेले हे यश, त्याची कर्तबगारी पाठीवर थाप द्यावी अशीच आहे. यापूर्वी त्याने महाराष्ट्र बार कौन्सिलची निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याची आर्थिक ताकद कमी पडली होती. आता मात्र त्याने पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरावे… त्याला नक्कीच यश मिळेल… आमच्या सदिच्छा त्याच्या पाठीशी आहेत.