
पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. अमित शाह यांचं दाबोली विमानतळावर भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे उपस्थित होते. गोव्यात अमित शाह यांच्या एकूण ३ सभा झाल्या यावेळी त्यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. काँग्रेससाठी गोवा म्हणजे केवळ सुट्टी एन्जॉय करण्याचे ठिकाण आहे. परंतु भाजपसाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. गोव्यात भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.
पोंडा विधानसभा मतदार संघात एका प्रचारसभेला संबोधित करताना अमित शाह यांनी भाजपानंच गोव्याचा विकास केला असल्याचा दावा केला. गांधी कुटुंबीयांसाठी गोवा तर फक्त सुटी एन्जॉय करण्याचं ठिकाण होतं, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली. भाजपानं गोव्याचं बजेट ४३२ कोटींहून (२०१३-१४) वाढवून २,५६७ कोटी (वर्ष २०२१) इतकं केलं, असं अमित शाह म्हणाले.
शाह यांनी गोव्यातून थेट दिल्लीतील गांधी परिवारावर टीकास्त्र डागलं आहे. गोव्यातील पोंडा शहरात अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित शाह म्हणाले, भाजपने गोव्यात विकास केला आहे. परंतु गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचे ठिकाण आहे. भाजपसाठी गोवा गोल्डन गोवा आहे. काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्या काळात गोव्याचा काहीही विकास केला नाही. भाजपने दिलेला शब्द मात्र पाळला आहे. गोव्याच्या विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचे कौतुक अमित शाह यांनी केलं आहे. गोव्याची माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत खुप मेहनत घेत आहेत, असे अमित शाह म्हणाले आहेत.
कोरोना आणि लसीकरणावरुनही अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. गोव्यातील लसीकरणाचे उदाहरण यावेळी शाह यांनी दिले. गोव्यातला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेळ देशात सर्वाधिक आहे. गोव्यात १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी झालो आहोत. भाजपा गोव्यात ३००० कोटींचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारेल असे आश्वासन अमित शाह यांनी गोव्यातील जनतेला दिलं आहे.
अमित शाह यांनी आज पोंडा येथील सभेला संबोधित करण्याआधी दक्षिण गोव्यातील बोरिम गावातील साईबाबा मंदिराचं दर्शन घेतलं. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अमित शाह सांवोदेंम विधानसभा मतदार संघात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी वास्कोमध्ये एका जनसभेला संबोधित करणार आहेत. अमित शाह ज्या ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्या सर्व ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचा काटेकोरपणे पालन केलं जाणार असल्याचंही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भाजपनं गोव्यात सर्वच म्हणजे ४० विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
—




