राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. शनिवारीच राष्ट्रपती कोविंद यांना ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) दिल्ली येथे दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं ठरलं होतं.
मी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांच्या चमूचं अभिनंदन करतो. ‘एम्सच्या संचालकांशी संवाद साधून मी राष्ट्रपतींच्या आरोग्याची चौकशी केली. आता त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो’, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं. शुक्रवारी छातीत दुखल्यामुळं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आर्मी रुग्णालयात गेले होते. ज्यानंतर ठरल्याप्रमाणं त्यांनी बायपास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता.