फोकस

नाशिक जिल्ह्यातील जवानाला सीमेवर वीरमरण

नांदगाव : राज्यात मकारसंक्रांती उत्साहात साजरी होत असतानाच नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) असं वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे. जवान अमोल यांच्या निधनांची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल हे सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल यांना वीरमरण आले. या अपघातात अन्य दोन जवानांना देखील वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे.

सैन्यात भरती होण्याआधी अमोल हे एका अपघातात जखमी झाले होते. पण त्यानंतरही त्यांनी सैन्यात भरती होण्याची जिद्द सोडली नाही. अखेरीस सहा वर्षांपूवी सशस्त्र सीमा बलामध्ये त्यांची निवड झाली होती. नुकताच दिवाळी सणात अमोल पाटील हे बोलठाण येथे सुट्टीवर आले होते. जाताना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांची चिमुकलीला सोबत घेऊन गेले होते.

दरम्यान, विरपूर सीमेवर त्याला वीरमरण आल्याची माहिती त्याचा बोलठाण येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. जवान अमोल यांचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून कोविड नियमांच्या आधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button