ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा तरुणाचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सहा वर्षांपूर्वी एका व्यासपीठावर एका तरुणाने कानशिलात लगावली होती. देवाशीष आचार्य असं या तरुणाचं नाव होतं. मात्र आता कानशिलात लगावणाऱ्या देवाशीष आचार्यचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. काही अज्ञात लोकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या देवाशीषला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवाशीषच्या कुटुंबाने त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
देवाशीष आचार्यला गंभीर स्थितीत मिदनापुरातील तोमलूक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रेकॉर्डवरून कळले की, देवाशीषला ४ वाजून १० मिनिटांनी काही अज्ञात लोकांनी रुग्णालयात आणले होते. त्यानंतर काही वेळेत त्याचा मृत्यू झाला. जेव्हा देवाशीषचे कुटुंब रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांना मृत्यूबाबत माहीत झाले. त्यांनी देवाशीषची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
देवाशीषला रुग्णालयात नेमकं कोण घेऊन आलं याचा पोलीस शोध घेत आहेत. घरातील मंडळींनी त्याच्या हत्येचा कट रचला गेल्याचं म्हटलं आहे. देवाशीषने २०२० मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात देवाशीष १६ जूनला दोन मित्रांसोबत मोटर सायकलने बाहेर गेला होता. यावेळी सोनापेट्या टोल प्लाझाजवळ एका चहाच्या दुकानावर ते थांबले. त्यानंतर तो अचानक निघून गेला. पुढे काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.




