घरात घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, माजी पोलीस अधिकाऱ्यासह पत्नी आणि मुलीची हत्या

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केलेल्या गोळीबार करुन, माजी पोलीस अधिकारी फैयाज अहमद आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या गोळीबारात अहमद यांची मुलगीही गंभीर जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिरेक्यांच्या गोळीबारात झालेल्या मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. रात्री ११ च्या सुमारास हा गोळीबार झाला. या गंभीर हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकांनी परिसराला घेराव घातला.
काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दहशतवादी अवंतीपुरा भागातील हरिपरिगावात घुसले. त्यांनी माजी पोलीस अधिकारी फैयाज अहमद यांच्या घरात शिरुन गोळीबार केला. यामध्ये अहमद यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आधी पत्नी आणि नंतर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे फैयाज अहमद यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अहमद यांची पत्नी राजा बानो (४८) आणि मुलगी राफिया जान (२५) यांचा समावेश आहे.




