मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे; नक्षलवाद्यांचे आवाहन
गडचिरोली: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे पत्रक खरंच नक्षलवाद्यांकडून जारी करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप साशंकता आहे. हे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांची असलेली दहशत पाहता खोटे पत्रक काढण्याची हिंमत कोणीही करणार नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, नक्षलवाद्यांना अचानक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात रस का वाटू लागला आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रमुख मराठा नेते आणि मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत.