Top Newsफोकस

‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका’; थरथरत्या आवाजात ममता सपकाळ यांचे आवाहन

पुणेः निराधार मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे असंख्य अनाथ मुले पोरकी झाली, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहेत. हजारो अनाथांची माय निघून गेली, असं वक्तव्य केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सपकाळ म्हणाल्या, कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका. ती आमच्यात अजूनही जिवंत आहे आणि यापुढेही राहणार आहे, हे सांगताना त्या अत्यंत भावून झाल्या.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना कन्या ममता यांना गहिवरून आलं होतं. आमच्यासाठी माईचा मृत्यू हा खूप अचानक झाला, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ममता म्हणाल्या, सिंधुताई सपकाळ आपल्यातून निघून गेल्या आहेत, हा शब्द अजिबात वापरू नका. ते एक वादळ होतं, शांत झालं. आईसारख्या व्यक्ती कधीच या जगातून निघून जात नाहीत. त्या असतात, त्या आहेत. त्यामुळे निघून गेल्या हे लेबल लावू नका…’

सिंधुताई आणि ममता यांचं शेवटचं बोलणं काय झालं, असा प्रश्न विचारला असता ममता म्हणाल्या, सध्या तरी तसं काही आठवत नाही. पण जे बोलणं झालं, त्यातही त्यांनी मुलांचीच चौकशी केली. मुलांची काळजी घ्या. शाळा सुरु झाल्या की नाही, मुले शाळेत जातात का, अशी चौकशी त्यांनी केली होती.

अनाथ मुलांना आधार देण्याचं मोठं कार्य सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर केलं. आता हे काम पुढेही असंच चालू राहणार असं आश्वासन ममता यांनी दिलं. त्या म्हणाल्या, ‘ तिचं सगळं काम जे.. ज्या पद्धतीने सुरु होतं, तसंच पुढे सुरू राहिल. तिने आम्हाला वाढवलं. तसंच, त्या पद्धतीतून हे कार्य अव्याहत सुरु राहील. त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्यात जिवंत आहे, असं ममता म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button