मुंबई : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटामुळे सध्या राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. त्याला कारण ठरलंय, राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकरलेली नथुराम गोडसेची भूमिका. हा चित्रपट त्यांनी का स्विकारला, नथुराम गोडसेबद्दल अमोल कोल्हे यांचं मत काय, महात्मा गांधी यांच्याबद्दल अमोल कोल्हेंना काय वाटतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीद्वारे दिली आहेत.
‘तो काळ असा होता जेव्हा मी कलाकार म्हणून स्वत: ला सिद्ध करत होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत होतो. हिंदी चित्रपटासाठी ही भूमिका माझ्यासमोर आली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, ‘ही माझ्या वैचारिक भूमिकेच्या विरोधातली भूमिका आहे. मी या भूमिकेचं कुठेही समर्थन करत नाही.’ त्यावेळी मला सांगण्यात आलं की, ‘कोर्टामध्ये-चौकशी आयोगासमोर नथुरामने जे स्टेटमेंट दिलंय तेच स्टेटमेंट तुम्हाला या भूमिकेच्या माध्यमातून मांडायचं आहे.’ पब्लिक डोमेनमध्ये असलेली गोष्टच जर मला सगळ्यांसमोर मांडायची आहे, तर तेव्हा मला खरोखर असं त्यावेळी वाटलं नाही की मी त्या विचारधारेचं उदात्तीकरण करतोय.’
‘मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हतो तेव्हा २०१७ मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं. त्यावेळी मला कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं की पुढे २०१९ ला मी राष्ट्रवादीत जाईन आणि शिरूरमधून मी लोकसभा निवडणूक लढवेन आणि जनताही मला निवडून देईल. त्यामुळे मी तेव्हा केलेल्या भूमिकेचा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध जोडू नये’, असं अमोल कोल्हे म्हणाले.
नथुराम गोडसे ही फक्त माझी त्या सिनेमातली भूमिका आहे. वैयक्तिक आयुष्यात गोडसेच्या कृतीचं किंवा त्या विचारांचं मी समर्थन करत नाही. मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती आहे, असं म्हणत ती फक्त आपली चित्रपटातली भूमिका असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांची बाजू घेतली. तसेच सिनेमातील भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यात फरक असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. गांधीवरील सिनेमा अमेरिकेतून प्रदर्शित झाला. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली. ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह; जयंत पाटलांची प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हेंच्या सिनेमाला विरोध केला आहे. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे. नथुरामचं समर्थन करत नाही. कोणी करू शकत नाही. भूमिका केली म्हणजे समर्थन होत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आव्हाडांची भूमिका योग्यच आहे, असं त्यांनी सांगितलं.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, असं पाटील म्हणाले.
नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका कोल्हे यांनी केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहीत नाही, असंही ते म्हणाले.
या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन ते घराघरात पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत. तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितलं.
अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका टाळली असती तर बरे झाले असते : पटोले
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे.
नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसे बद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. परंतु डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही. देशातील एका विशिष्ट विचारसरणाचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात परंतु ७५ वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचाराचे महत्व कमी झालेले नाही उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत परंतु गांधी विचार व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.