
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अर्थातच आमिर खान आणि दिग्दर्शक, निर्माती पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदन जारी करत या निर्णयाविषयी माहिती दिली. लग्नाच्या १५ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण मंनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे.
१५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू, असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सर्वांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहील असे आमिर खानने सांगितले आहे.
२०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून दोन मुलं आहेत, आयरा खान आणि जुनैद खान.
कशी झाली दोघांची भेट?
एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, मी जेव्हा ‘लगान’ सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती युनिटचा भाग होती. माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो ‘My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो’. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.
दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.
आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र
या सुंदर १५ वर्षांमध्ये आम्हाला एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंदाने जगता आलं. आमचं नातं केवळ विश्वास, आदर आणि प्रेम यावरच फुलले. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा आहे. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता, माता-पिता आणि कुटुंबाच्या रुपात राहू.
आम्ही काही काळापूर्वीच नियोजनपूर्वक वेगळं होण्याची सुरुवात केली होती. आता त्याला औपचारिक रुप दिल्यानं बरं वाटत आहे. विस्तारित कुटुंबाप्रमाणं आमचं जीवन वेगळं जगणार असलो, तरी महत्वाच्या प्रसंगात एकत्र असू.
आम्ही मुलगा आझादची जबाबदारी आई-वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करु. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावूक आहोत.
आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य करणारे आमचे कुटुंबीय आणि मित्र यांनादेखील धन्यवाद देतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सुरक्षितपणे या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो.
आम्हाला आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, अशा दृष्टीने पाहाल!
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मोठं काम
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली. जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.




