
मुंबई : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला भाजप कारणीभूत होता, ही सत्य परिस्थिती आहे, असं सांगतानाच आता तिसऱ्या लाटेलाही भाजपच जबाबदार ठरणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोरोना नियमांची ऐसीतैसी
दरम्यान, भाजपच्या चारही केंद्रीय मंत्र्यांनी राज्यभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रांना प्रचंड गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी लोक मास्क शिवाय यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेतून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा स्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही रॅली काढून गर्दी जमवण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.




