
मुंबई : क्रिकेट किंवा राजकारणाध्ये लूज बॉल आला की फटका मारायचा पण फटका मारताना विकेट टाकायची नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वानखेडे मैदानावर लगावला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमधील आदरातिथ्य कक्षाला भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे तर नॉर्थ स्टॅण्डला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील चांगलीच टोलेबाजी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांनी पदार्पण केलेल्या दिवसाला शुक्रवारी ५० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांना सुनील गावस्कर आदरातिथ्य कक्ष बहाल केला. त्याचप्रमाणे क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या नॉर्थ स्टॅण्डला माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले. यंदाचे वर्ष भारताचे माजी कसोटी वीर माधव मंत्री यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार भारताचे माजी कसोटी वीर गुंडप्पा विश्वनाथ भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. गोल्डन मोमेंटस या नावाने करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांनी आपल्या कारकिर्दीतील सोनेरी क्षणांना उजाळा दिला. यावेळी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडूलकर याने वेंगसरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी असे म्हटलं आहे की, क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनले आहे. मलाही वाटायचे क्रिकेटर व्हावे पण ते शक्य झाले नाही. पण मी मैदानात उतरलो आहे. ते सुद्धा जगविख्यात संघातून उतरलो आहे. फक्त इथल्या धावपट्टीसोबत माझी आठवण आहे. क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो लूज बॉल आला का फटका मारायचा मग मात्र विकेट टाकायची नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
शमीवरील टीका अशोभनीय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वी झालेल्या इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या पराभवावर वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर शमीवर टीका करण्यात येत होती. परंतु त्या टीका अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. आपण आता येणाऱ्या सामन्यांमध्ये नक्की जिंकू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच क्रिकेट स्टेडियममध्ये व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघण्यापेक्षा स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघणार्यांना ते अधिक कळते, असे सांगत शरद पवार यांनी अप्रतिम कोपरखळी मारली. त्याचा सामना करताना उद्धव ठाकरे यांनी याच व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट पाहिल्यामुळे आपण स्विंग आणि स्पिन उत्तम करतो, असे सांगत त्याला प्रत्युत्तर दिले.
भारतीय संघासाठी मुंबईकर खेळाडूंनी केलेले विक्रम हे मुंबईकरांकडूनच मोडले जावेत यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातील राज्य सरकारचा भार उचलण्यासाठी सरकार मागे हटणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
या कार्यक्रमात गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांची आपल्या आठवणींना उजाळा देणारी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची वाटचाल कशी देदीप्यमान मार्गाने सुरू आहे हे दाखवणारी मान्यवरांची भाषणे झाली.
तेंडूलकरने दिला आठवणींना उजाळा
सचिन तेंडूलकरने जुन्या आठवनींना उजाळा देताना दिलीप वेंगसरकरांच्या आठवणींचा किस्सा सांगितला आहे. त्याने वेंगसरकरांची कार्यशैली आणि त्यांच्यात असलेल्या क्रिकेट प्रेमाची आठवणही करून दिली. सचिनने सांगितले वानखेडे मैदानावर जो वेंगसरकरांच्या नावाचा जो स्टँड उभारला आहे. ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच त्याने कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. सचिनने वेंगसरकर सरांसोबत आपल्या अविस्मरणीय आठवणी असल्याचे सांगितले. माझे आणि वेंगसरकर सरांचे कसोटी सामन्यांसाठी नावं आले होते असे सचिन म्हणाला.
सचिनने जुन्या आठवणी ताज्या करताना सांगितले, वासु सरांसोबत पहिली भेट इंदोरमध्ये झाली होती. त्यावेळी २४ वर्षात मी कधीच भारतीय खेळाडूला फलंदाजी करताना बघितले नव्हते सर्वजण गोलंदाजी करायचे, वयाच्या १४ व्या वर्षी कपिल देव यांच्यासोबत खेळलो होतो. सोबतच वेंगसरकरांचे आपल्या जीवनातील स्थान सांगताना सचिनने वेंगसकरांमुळे माझ्या जीवनाला गती आल्याचे सांगितले. सीसीआरला फलंदाजी करताना वेंगसरकर सरांनी मला पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहिले होते. मला वेंगसरकरांनी बॅट दिली तेव्हा मी खूप भारावून गेलो होतो मी त्यांना धन्यवादही न बोलता तिथून निघालो, माझा पूर्ण गोंधळ उडाला होता मला संदीप पाटीलने आठवण करून दिली तेव्हा मी परत जाऊन सरांना धन्यवाद बोललो होतो.
त्यानंतर माझी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली, त्यातीलच सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे हरियाणा विरूध्द आम्ही रणजी ट्रॉफी खेळलो. आमचा शेवटचा बळी राहिला होता तो सामना आम्हाला एका धावेमुळे गमवावा लागला होता. आमचा शेवटचा गडी धाव काढताना बाद झाला होता. त्या सामन्यात वेंगसरकर सरांनी नाबाद अर्धशतक झळकावले होते तरीही आमचा सामन्यात पराभव झाला होता, त्या सामन्यातील वेंगसकर सरांची स्थिती मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी जेव्हा ड्रेसिंग रूमकडे कूच केली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचे मी पाहिले आहे. त्यावरून माझ्या लक्षात आले की क्रिकेटवर प्रेम काय असतं, चिकाटी काय असते एवढ्या मोठ्या खेळाडूच्या देखील डोळ्यातून अश्रू कारण त्यावेळी वेंगसरकर सरांनी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले होते. आणि तरीही ते मुंबईला खेळत होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी, अशा शब्दांत सचिनने वेंगसकरांच्या आठवनींना उजाळा दिला. सचिनने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार व्यक्त करत, मुंबईच्या सर्व संघाना शुभेच्छा दिल्या आहेत.




