
मुंबई : मुंबईसह राज्यात सकाळपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अवकाळी पावसामुळे मुंबईकराचीही दाणदाण उडाल्याचं चित्र आहे. वरळीच्या मुख्य रस्त्यावरं पाणी साचल्याचं पाहिला मिळत आहे. वरळीहून हाजीअली, महालक्ष्मीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना साचलेल्या पाण्यातून वाट काढवी लागत आहे. अचानक पडलेला पावसानं मु़ंबईकरांनाही चांगलीचं कसरत करावी लागतेय. मुंबई उपनगरात बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगावसह अंधेरी वांद्रे परिसरात आज सकाळपासूनच सूर्यकिरणे दिसली नाहीत, या भागात काळ्या ढगांसह हलका पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईकरांची उन्हापासून सुटका झाली आहे आणि आता थंडी जाणवत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. सकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी १२ नंतर मात्र सलग पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. संपूर्ण आभाळ भरून आलेले असून ढगाळ वातावरणा नुसार जोरदार पाऊस पडण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसाने वसई पाचूबंदर, किल्लाबंदर, विरार अर्नाळा किल्लाबंदर, अर्नाळा गाव या परिसरातील समुद्र किनाऱ्यावर कोळंबी, सुकी मच्छी, बोंबील या पावसात भिजल्याने त्या पूर्ण खराब होऊन, मच्छिमारांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये रिमझिम
कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अर्ध्यातासापासून कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये कांदा पिकाला फटका
अरबी समुद्रात कमी दाबाचा पाटानिर्माण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे कांदा पिकाला फटका बसून नये म्हणून महागडी औषधे फवारण्याची वेळ येवला तालुक्यातील कांदा उत्पादकांवर आल्याचे चित्र दिसते
देवगड हापूसला फटका
सतत बदलत असलेल्या हवामान बदलाचा फटका देवगड हापूसला बसला आहे. गेले १५ ते २० दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि दमट वातावरणाचा सामना येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या आंबा मोहोराचा हंगाम असून देवगड हापूसच्या कलमांना चांगलाच बहर आला होता मात्र दमट वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मोहर कुजून गळून पडला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच देवगड हापूस कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली असतानाच अवकाळी पावसामुळे पहिल्या टप्यात येणारा आंबा वाया गेला आहे. आलेल्या मोहोरांवरती एक दिवस आड करुन किटकनाशक तसेच बुरशी नाशकांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे.




