
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता.
अजित पवार यांना पत्रकारांनी राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील, असं विधान केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली.
‘नागरिकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील,’ अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या.
राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत. मात्र त्यांचा उल्लेख चक्क मुख्यमंत्री म्हणून केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क काढला जातो आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, अजित पवार काय म्हणाले?
देशीतल कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गैरहजरी हा राज्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यावर अजित पवार यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून जाहीर कार्यक्रम, बैठकांमध्ये सहभागी झालेले नाहीत. तसेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी उपस्थिती लावली नाही. शुक्रवारी झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या कोरोना आढावा बैठकीतही ते उपस्थित नव्हते. प्रत्येक वेळी मीटिंगला प्रत्येकानेच उपस्थित राहणे आवश्यक नसते. कुणाची काही अडचण असू शकते. कुणी कोरोनामुळे क्वारंटाइन असतं. मात्र पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सीताराम कुंटे, दिलीप चक्रवर्ती आदी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील लसीकरणाविषयीची समस्या मांडली. १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांकडे येत आहेत. मात्र लसीचे डोस कमी पडत आहे. हा पुरवठा वाढवण्यासंबंधीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. तसेच साठ वर्षांपुढील व्यक्तींनी बूस्टर डोस घ्यावा, असं सांगितलं जातंय, त्याकरिताही केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली, असं अजित पवारांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही, यावरून राजकारण किंवा टीका टिप्पणी करायचं कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या टीमचे सहकारी म्हणून आम्ही, तसेच इतर सर्व अधिकारी योग्य काम करत आहेत. टास्क फोर्समधील विख्यात डॉक्टर्स या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्रीदेखील स्वतः दररोज या सर्व घडामोडींचा आढावा घेतात. त्यामुळे यात राजकारण करण्यासारखं काहीच नाही.




