राजकारण

परमबीर सिंग यांचा मुक्काम चंदीगडमध्येच!

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यानंतर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं. परंतु परमबीर सिंग चंदीगडमध्ये आहे. परमबीर सिंग यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

परमबीर सिंग यांना १७ नोव्हेंबरला फरार घोषित करण्यात आले होते. फरार घोषित केल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ३० दिवसात परमबीर सिंग जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. परंतु त्या अगोदर परमबीर सिंग यांनी चंदीगढ येथे असल्याची माहिती वृत्तवाहिनीला दिली असून लवकरच न्यायालयाच्या आदेशानुसार हजर होणार आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरगांव येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागानं परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर न राहील्यानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं. खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे कुठेही सापडत नसल्यानं अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीनं विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यात यावे असा विनंती करणारा अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी अ‍ॅड. शेखर जगताप यांनी या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, १२०-ब व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट ही जारी केल्याची माहिती दिली.

या तिन्ही आरोपींना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ते तिथं आढळले नाहीत. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम ८२ व ८३ अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी आणि फरार घोषीत करावे अशी विनंती केली. याची दखल घेत मुख्य अतिरिक्त महानगर दंडाधिकारी भाजीपाल यांनी फरार घोषीत करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर जर महिन्याभरात परमबीर सिंग कोर्टापुढे हजर झाले नाहीत तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होऊ शकते

खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले परमबीर सिंग हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करण्यात यावं, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी अर्जातून कोर्टाकडे करण्यात आली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप तपासयंत्रणेसमोर आलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button