इतर

ससूनमधून पळताना आरोपी अ‍ॅड. दीप्ती काळेचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

पुणे : मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळेचा रुग्णालयातून पळून जाताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाथरुममधून पळ काढण्याचा दीप्ती काळेचा प्रयत्न होता. मात्र आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे तिला प्राण गमवावे लागले. कोरोना संसर्ग झाल्यामुळे तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ४२ वर्षीय दीप्ती काळेने ससून रुग्णालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असं वृत्त आधी समोर आलं होतं. परंतु पळून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी आणखी एक तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केलेल्या टोळीची दीप्ती काळे ही प्रमुख होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिच्यावर कालच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दीप्तीला ससून रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंघोळीला जात असल्याचे कारण सांगून ती बाथरुममध्ये गेली. त्यानंतर खिडकीच्या काचा सरकवून पाईपवरुन उतरण्याचा तिने प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पसार होण्याच्या प्रयत्नात तिचा पाय निसटला आणि ती थेट आठव्या मजल्यावरील डक्टमधून खाली पडल्याची माहिती आहे. बराच वेळ होऊनही बाहेर न आल्यामुळे पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावून पाहिला. कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने दार उघडून पाहिले असता काचा सरकवल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता दीप्ती काळे खाली गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दीप्तीला मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button