अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी एका सत्र न्यायालयाला दिली.
छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक झाल्यानंतर दिल्लीच्या तिहार तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. त्याच्याविरुध्द मुंबईत नोंदविण्यात आलेली सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत. तसंच त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. तिहारच्या सहाय्यक जेलरने फोनद्वारे सत्र न्यायालयाला सांगितले की, एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजन याला न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही. कारण, गुंड राजन कोरोना पॉझिटिव्ह आला असून उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
छोटा राजन विविध गुन्ह्यांच्या प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडोनेशियातून प्रत्यार्पण केल्यापासूनच तो तुरुंगात आहे. राजन महाराष्ट्रातील तब्बल ७० प्रकरणांमध्ये आरोपी आहे. यात २०११ मध्ये झालेली पत्रकार जे डे यांच्या हत्येचं प्रकरणही सामील आहे.