‘एनआयए’कडून सचिन वाझे आणि राजकीय नेत्यांमधील आर्थिक हितसंबंधांची चौकशी होणार?
गृहमंत्री, पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी
मुंबई : तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. एनआयएला सचिन वाझेंविरोधात काही तरी सबळ पुरावा मिळालाय, असा अंदाज बांधला जातोय. या प्रकरणी सचिन वाझे यांचे राजकीय नेत्यांसोबत आर्थिक संबंध असल्याचंही बोललं जातंय. या प्रकरणात आता इतरही अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अटकेनंतर आता भाजप आक्रमक झाला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले. सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले. वाझे हे शिवसेनेचे प्रवक्त होते. त्यामुळे आता ओसामा सचिन वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, हे आता बघावे लागेल. याप्रकरणात आणखी काही गोष्टी लवकरच समोर येतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते अनेकवेळा आयुक्त परमबीर सिंह यांना भेटले होते. या दोघांत दीर्घकाळ चर्चाही झाली होती. तर विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांनी केवळ सचिन वाझे यांची बदली केली होती. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले होते.