इतर

मनसुख हिरण हत्याप्रकरणात सचिन वाझेंचा सहभाग उघड : एटीएसचा दावा

मुंबई : एटीएसला आपल्या तपासात अनेक पुरावे सापडले, त्यावरुन सचिन वाझे यांचा जबाब खोटा असल्याचं निष्पन्न झालं. अशातच सध्या सचिन वाझे यांचा मनसुख हिरण यांच्या हत्या प्रकरणात काय संबंध आहे? यासंदर्भातील पुढील चौकशी सुरु आहे. एटीएसनं मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डचा शोध घेतला. हे सिम कार्ड मुंबईत पत्त्याचे क्लब आणि बेटिंग घेणाऱ्या क्लब चालवणाऱ्या एका इसमाने सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळवले होते. हे सिम कार्ड एका कंपनीच्या नावाने खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. प्राथमिक चौकशीत सिम कार्ड बुकी नरेश रमणिकलाल कौर याने सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन आरोपी विनायक शिंदे यांच्याकडे दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर नरेश कौर आणि विनायक शिंदे यांनाही एटीएसनं अटक केली, अशी माहिती एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी दिली.

जयजित सिंह यांनी पत्रकार परिषदेत मनसुख हिरण हत्या प्रकरणाची माहिती दिली आहे. तसेच सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका करु असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर घटनास्थळी कोणताही पुरावा सापडला नव्हता, पण गुन्ह्यात वापरलेल्या सिम कार्ड्सचा आम्ही शोध लावला होता, काही सिम कार्ड्स आरोपींनी नष्ट केले होते. तसेच याप्रकरणी आता आणखी काही आरोपींना आणि संशयितांना अटक होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.

एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी बोलताना सांगितलं की, “दिनांक 6 मार्च 2021 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली होती. हा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. 7 मार्च रोजी एटीएसने याप्रकरणाची सर्व कागदपत्र प्राप्त करुन त्याच दिवशी मनसुख हिरण यांची पत्नी आणि विमला हिरण यांचा जबाब नोंदवला. त्यावेळी विमला हिरण यांनी आपल्या जबाबत सचिन वाझे यांनीच आपल्या पतिचा खून केल्या आरोप केला होता. विमला हिरण यांच्या जबाबावरुन एटीएसनं याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. सदर गुन्ह्यातील घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी सचिन वाझे यांनी त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी आपल्या ताब्यात कधीही नसल्याचं सांगितलं. तसेच मृत मनसुख हिरण यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत या गुन्ह्यात आपला सहभाग नसून याप्रकरणाबाबत काहीच माहिती नसल्याचंही सांगितलं.”

एटीएस प्रमुख जयजित सिंह बोलताना म्हणाले की, “विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलातील 2007 साली वर्सोवा येथे झालेल्या लखनभैय्या चकमक प्रकरणातील आजीवन कारावासाची शिक्षा झालेला आरोपी आहे. तो सध्या मे 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पॅरोलवर बाहरे असताना त्याने हा अपराध केला आहे. त्याने मयत मनसुख यांच्याशी संपर्क केला त्यांना बोलावून घेतलं. आणि त्याचा या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असून गुन्हा कसा केला यासंदर्भातील प्रात्यक्षिकही घेण्यात आलेलं आहे. दोन्ही आरोपींमध्ये सिम कार्डची देवाण-घेणाव झाल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच काही सिम कार्ड आरोपींनी नष्ट केल्याचीही माहिती मिळाली. दोन्ही आरोपींनी दिलेली माहिती यावरुन एक पथक दमणला रवाना झालं आहे होतं. एक वोल्वो कार आणि संशयित आरोपीसह हे पथक मुंबईत पुन्हा आलेलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.”

दरम्यान, याप्रकरणी अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच अद्याप अनेकांची साक्ष नोंदवणं बाकी आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही आरोपींना आणि संशयितांना अटक होऊ शकते. सध्या सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत. अशातच मनसुख हिरण हत्या प्रकरणी त्यांची कसून चौकशी करणं आवश्यक असल्यानं सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका करणार असल्याचं एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी बोलताना सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button