इतर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

सातारा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव (Dhananjay Jadhav) यांचे निधन झाले. मंगळवारी (30 मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती.

नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धनंजय जाधव यांचा जन्म 1947 मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले

धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन 1973 मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं. काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर 2007 मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली.

जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल 1992 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button