इतर

सचिन वाझेंचे तोंड उघडण्यात ‘एनआयए’ला यश; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच ही माहिती ‘एनआयए’ला दिल्याचे समजते.

त्यामुळे आता ‘एनआयए’च्या हाती आणखी महत्त्वाची माहिती लागणार आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात या दोन्ही वाहनचालकांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याच्या चौकशीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. परंतु, NIA लवकरच दोन्ही वाहनचालक आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करेल, असे समजते.

पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझे?
आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पीपीई किट घालून चालायला लावणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेतील. त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन अनेक पुरावे समोर आणले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांचा सचिन वाझे यांच्या गुन्हे तपास शाखेशी (CIU) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मास्टरमाईंड दुसराच…!

स्फोटकांच्या स्कॉर्पिओ प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असली तरी ते फक्त एक प्यादे असून या प्रकरणाचा मास्टरमाईंड दुसराच असल्याचे एनआयएच्या सुत्रांनी सांगितले. सचिन वाझे यांना अटक करण्यापूर्वी एनआयएकडून त्यांची तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीतून ही माहिती उजेडात आल्याचे सुत्रांकडून समजते.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळील स्फोटकांच्या स्कॉर्पिओमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११.३० वाजता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली.अटकेनंतर रविवारी दुपारी त्यांना विशेष सेशन कोर्टातील एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सुमारे तेरा तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. त्यांच्यावर एनआयएने काय आरोप ठेवले याबाबत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप वाझे यांच्या वकिलांनी केला. तर एनआयएच्यावतीने काही कागदपत्रे विशेष कोर्टात सादर करुन वाझे यांची चौदा दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली. कोर्टाने ती मान्य करुन सचिन वाझे यांना अकरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. वाझे यांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान गुन्हे शाखेसह विक्रोळी पोलीस ठाण्यातील इतर काही पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले, मात्र या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्फोटकांच्या स्कॉर्पिओचा तपास एनआरएकडे सोपविला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून एनआयएकडून सर्व कागदपत्रांची शहानिशा सुरु होती. याच गुन्ह्यांत शनिवारी एटीएसचे श्रीपाद काळे, गुन्हे शाखेचे नितीन अलकनुरे यांच्यासह सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली होती, चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर काळे आणि अलकनुरे यांना सोडून देण्यात आले. मात्र तेरा तास सचिन वाझे यांची चौकशी सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button