Uncategorized

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणावर अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे.

यातच हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी लागल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे.

देशमुख यांचे राजीनामा पत्र, जसेच्या तसे…

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button