अर्थ-उद्योग

बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट

वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतला आहे. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मागील २७ वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचं सांगितलं.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी संयुक्त पत्रकात म्हटलं, “आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांच्या प्रवासात आम्ही ३ मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.”

“भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती,” असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटलं.

बिल गेट्स यांनी १९७५ मध्ये तारुण्यात अर्ध्यावरच आपलं कॉलेज सोडलं. त्यानंतर ते न्यू मॅक्सिकोमध्ये अल्बुकर्क येथे आले. या ठिकाणी त्यांनी आपला लहानपणीचा मित्र पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. २०१८ मध्ये पॉल एलन यांचा मृत्यू झाला. १९८० मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएमसोबत एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टम तयार केली. नंतर ही सिस्टम एमएस डॉस (MS-DOS) नावाने ओळखली गेली.

मायक्रोसॉफ्ट १९८६ मध्ये खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचली. त्यानंतर एका वर्षातच वयाच्या ३१ व्या वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. ते सर्वात कमी वयाचे अब्जपती ठरले. गेट्स २००० पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेट्स आपला सर्वाधिक वेळ या संस्थेच्या कामासाठीच देतात. याचाच भाग म्हणून त्यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये स्वतः जाऊन भेटी दिल्या. तसेच या देशांमधील महत्त्वाचे प्रश्न समजून घेत त्यात कामासाठी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button