परमबीर सिंग अखेर सोमवारी चांदीवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार

मुंबई : वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्याने चांदिवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदीवाल यांनी काल दिला होता. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर होणार असल्याचे परमबीर यांच्या वकिलांनी आयोगाला माहिती दिली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सध्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची उलटतपासणी सुरू आहे. गेले सात महिने अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अखेर गुरुवारी मुंबईत प्रकटले. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेल्या सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. एकेकाळी परमबीर हे ज्यांचे प्रमुख होते, त्याच पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपली साक्ष नोंदवण्याची नामुष्की आली.
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गुन्हे शाखेने विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी घेत तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेत अटक केली होती. गोरेगाव येथील दाखल खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर फरारची नोटीसही चिकटवली होती
याआधी याच आठवड्यात मंगळवारी सचिन वाझेंना आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले होते. या आयोगाच्या कामकाजादरम्यान कार्यवाही सुरू करताना सचिन वाझेने आयोगासमोर एक याचिका दाखल केली. जोवर परमबीर सिंग हे चौकशीला हजर होत नाहीत आणि प्रतिज्ञापत्र देत नाहीत, तोवर साक्ष नोंदवणे टाळावे अशी मागणी वाझेंनी केली होती. पण चांदिवाल आयोगाने ही याचिका फेटाळली. या चौकशी दरम्यान परमबीर सिंग यांचे वकील यांनी आयोगाला सांगितले की, या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देणे शक्य नाही. सिंग यांचे वकिल चंद्रचूड यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली होती.
परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात पाच खडणीच्या प्रकरणांची तक्रार आहे. या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासोबतच सहाजण आरोपी आहेत. त्यामध्ये सचिन वाझेंच्या नावाचाही समावेश आहे. सचिन वाझेंना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. तसेच सध्या वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मुंबईच्या किला कोर्टाने परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणात फरार घोषित केले आहे. किला कोर्टातही परमबीर सिंग येत्या सोमवारी अर्ज करणार आहेत.
अजामीनपात्र वॉरंट १५ हजारांच्या जातमुचलक्यावर रद्द
परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. परमबीर सिंग ठाणे न्यायालयात दाखल झाले आहे. मुख्यदंडाधिकाऱ्यांचा दालनात हजेरी लावली असून अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे.




