नाईलाजास्तव काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई : राज्यातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक नेत्यांनी लस घेतली. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेकांनी कोरोनाची लस घेतली. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी कोरोना लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना लस घेण्याची विनंती केली. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना वाढत असल्याची चिंता व्यक्त करत लॉकडाऊनचा इशारा दिला.
कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पुढील काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागले. म्हणून कोरोना लसीकरण करून घ्यावी, अशी माझी पुन्हा विनंती आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनावश्यक गर्दी टाळा, बाहेरचं अनावश्यक येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, अंतर ठेवला, हात धुवा. आता आपल्याला पहिल्यापासून कदाचित पुन्हा सुरुवात करावी लागेल. त्यामुळे अजूनही परिस्थिती हाता बाहेर गेलेली नाही. आणि जाऊ नये असे वाटत असेल तर या बंधनाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल.’
लॉकडाऊनबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दरम्यान आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरात ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. १५ ते २१ मार्चपर्यंत नागपूरात लॉकडाऊन असणार आहे.
नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई या शहरात देखील कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता नागपूर शहरात देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याची घोषणा नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत. तसेच ऑनलाईन विक्री सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तर खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहणार आहे. त्याचबरोबर ओळखपत्रे बाळगणेही आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे आता लसीकरण देखील सुरु करणार असून १३१ केंद्रावर लसीकरण करण्यात यावे, अशी आमची योजना आहे. यासाठी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक संस्था यांनी देखील आपल्या भागातील लोकांना वाहतूकीची सोय करुन घ्यावी आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्याची आणण्याची सोय करावी’.