Top Newsराजकारण

तालिबान उद्या नमाजनंतर करणार नव्या सरकारची घोषणा

काबूल : अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, आता तालिबान शुक्रवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा शुक्रवारच्या नमाजानंतर केली जाईल. १५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. आता अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या वर्चस्वाखाली आला आहे. अमेरिकेन आपले सैन्य सोमवारी रात्रीच अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्या बाहेर पडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला होता. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले.

अफगानिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा या सरकारचा सर्वेसर्वा अर्थात सुप्रीम लिडर असेल आणि पंतप्रधान अथवा राष्ट्रपती त्यांच्या आदेशावरच काम करतील. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनामुल्ला समांगनी याने म्हटले आहे, की नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही जाहीर करू ते इस्लामीक सरकार, लोकांसाठी आदर्श सरकार असेल. अखुंदजादाच्या नेतृत्वात सरकार बनण्यासंदर्भात कसल्याही प्रकारची शंका नाही. तो सरकारचा प्रमुख असेल, याबाबत कुठलाही प्रश्न उद्भवत नाही.

मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे याआधी कधी समोर आले नाहीत. त्यांच्या ठिकाणांबद्दल कोणाला खास माहिती नाही. ते नवीन सरकारमध्ये कंधारमधून काम करतील असे समजते. एका वृत्तानुसार, तालिबानने यापूर्वीच विविध प्रांत आणि जिल्ह्यांसाठी राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नेमले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button