Top Newsराजकारण

चरणजीतसिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंग चन्नी अखेर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत दोन मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

चरणजीतसिंग चन्नी यांनी आज सकाळी राजभवन येथे जाऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्याशिवाय सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, चन्नी यांच्या मंत्रिमंडळातील केवळ दोनच मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे चन्नी कॅप्टन अमरिंदर सिंगच्या टीममधील मंत्र्यांना पुन्हा संधी देणार की गुजरात फॉर्म्युल्यानुसार नवीन चेहऱ्यांना संधी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चन्नी मंत्रिमंडळातील जातीय समीकरण कसे राखतात, किती महिलांना संधी देतात आणि अनुभवी नेत्यांचा वापर कसा करतात? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाले होते. हायकमांडने एका सामान्य माणसाला मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली आहे. ज्याच्या घराला छत नव्हतं, आज काँग्रेसने त्याला मुख्यमंत्री केलं आहे, असं भावूक उद्गार चन्नी यांनी काढलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घेण्याचं आवाहन केलं. कृषी कायदे मागे घेतलं नाही तर कृषी व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल. त्याचा पंजाबच्या प्रत्येक घराला फरक पडेल. परंतु आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांना कमजोर होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button