Top Newsराजकारण

समर्थ रामदास नसते तर शिवरायांना कुणी विचारलं असतं? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नवीन वाद

औरंगाबाद : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे, ‘समर्थ रामदास’ यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना कुणी विचारलं असतं? असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

औरंगाबादमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसंच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संत साहित्यशिक्षण व संशोधन प्रतिष्ठान समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट. समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे आणि समर्थ मंदिर संस्थान, जांब यांच्यावतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत असताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केलं.

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय राजेंद्र कोंढारे यांनी राज्यपाल यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. राज्यपाल पदावर बसलेल्या एवढ्या मोठ्या व्यक्तीने असे विधान करणे हे शोभणारे नाही. शिवाजी महाराज यांच्या खऱ्या गुरू माँ जिजाऊ आहे, जिजाऊ यांनी महाराजांनी शिकवण दिली. समर्थ रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरू आहे, असं सांगून शिवरायांना लहान करण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांच्या विधानाच्या आम्ही निषेध करतो, असं कोंढारे म्हणाले. तसंच, राज्यपाल यांनी माँ जिजाऊ यांचा उल्लेख केला असता तर ते स्विकारता आले असते. पण, त्यांनी समर्थ रामदास यांचं नाव घेणे हा द्रोह आहे, अशी टीकाही कोंढारे यांनी केली.

बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते १६७२ पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नसल्याचं मत काही इतिहासकार व्यक्त करतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जानेवारी २०२० मध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते’, असं वक्तव्य केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button