
मुंबई : हेलिकॉप्टर उड्डाणास ढगाळ वातावरणाचा अडथळा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पालघरला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता ऑनलाईन होणार आहे. दुपारी १२ वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाले आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
भर पावसात रस्ता केला अन् मुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द
जिल्ह्यात सध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून आज जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार होते. हे सर्व बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार आहेत. यामुळं दौऱ्याआधी या मार्गाच्या दुरुस्तीचे काम भर पावसात काल सुरू करण्यात आले. त्यामुळे कधी नव्हे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी पालघर दौराच रद्द केला आहे.
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अखेर मुख्यालयाच्या उद्घाटनाला आजचा मुहूर्त मिळाला. १९ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयाचं उद्घाटन होत आहे. जिल्हा मुख्यालयाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इतर दोन अशी पाच कार्यालये एकाच प्रांगणात आहेत. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी १ ऑगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा निर्मितीच्या ७ वर्षांनंतर ६६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेत प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली आहे. या भव्य अशा आवारात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हापरिषद कार्यालय, प्रशासकीय अ, प्रशासकीय ब अशा ५ इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये ४० च्या वर शासकीय कार्यालये चालू होणार आहेत.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या ठिकाणी कुपोषणसारखा महत्वाचा प्रश्न आहे. आज उदघाटनानंतर मुख्यमंत्री पालघर जिल्ह्यासाठी काही महत्त्वाची घोषणा करतात का हे पाहणे गरजेचे आहे.