महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही : राज ठाकरे

औरंगाबाद : राज्यातील ठाकरे सरकार लवकरच पडेल असे दावे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. त्यासाठी वारंवार तारखा दिल्या जातात. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं राज म्हणाले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुका आल्यानं राज ठाकरे बाहेर पडल्याची टीका विरोधक करतात. त्या टीकेला राज यांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणुका येतच राहतात. त्यामुळे निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पण त्याचीही खात्री देता येत नाही. त्याही निवडणुका सहा आठ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं प्रकरण सुरू आहे. केंद्रानं मोजायचं की राज्यानं मोजायचं यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. कोणी सामोरं जायला तयार नाही. आमच्याकडे मतं मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसींना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असं राज यांनी म्हटलं.
सध्या तरी लोक मला फुकट घालवत आहेत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही, निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनताही मतपेटीतून राग व्यक्त करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले. मनसेने अनेक वर्षे टिकेल असा विकास केला. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, असं ते म्हणाले.
रणनिती सांगण्यास स्पष्ट नकार
यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना आगामी निवडणुकीसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, असा प्रश्न विचारला. त्यावर राज म्हणाले, स्ट्रॅटेजी ही हिडनच असते, उघड केली जात नाही. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचे काम झालेले नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, आज जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
एसटीसारख्या जुन्या संस्थेला पुढे आणण्यासाठी उपाय
महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज ठाकरे यांनी अत्यंत सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली. एसटीसारख्या अत्यंत जुन्या आणि ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या संस्थेविषयी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, मात्र याऐवजी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोघेही या प्रश्नात हात धुवून घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने ही मागणी मान्य न करता त्यांना ४१ टक्के पगारवाढ दिली आहे. कर्मचारीदेखील आपल्या मागणीवर अडून आहेत. राज्य सरकारने या आंदोलनामुळे असंख्य कर्चमाऱ्यांचं निलंबन केलंय. या प्रश्नावर तुमचं काय मत आहे, याविषयी राज ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, एक लाख कर्मचारी एकदम सरकारच्या अंगावर आले तर काय करणार सरकार. चार चार महिने त्यांचे पगार होत नाहीत. ऐन दिवाळीत कर्चमाऱ्याच्या घरी पगार नाही झाले. बाकीच्यांचे पगार होतात. मग कर्मचाऱ्यांचे का नाहीत? १९६० सालातली ही एवढी जुनी संस्था आहे. तिच्यातला भ्रष्टाचार थांबला तर निश्चितच संस्था पुढे येईल. याविषयी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील बोललो आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमली पाहिजे. या कंपनीच्या देखरेखीखाली सर्व कारभार चालेल. कर्मचाऱ्यांनीही हा विषय जास्त जाणू नये. पण कुणीही यात समजून घ्यायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही हात धुवून घ्यायचे ठरवले आहे.




