
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या विधानावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता होती. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली.
राजधानी नवी दिल्लीत राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. अनंत गीते यांच्या पवारांवरील टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, त्यांनी मला गीतेंचं वक्तव्य माहिती नाही, असं म्हणत त्याच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र पत्रकारांनी याच विषयावर बोलण्याच्या आग्रह धरल्यावर त्यांनी नाराजीच्या सुरातच गीतेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महाराष्ट्रातली व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून ठरवलंय, सरकार बनवायचं आणि चालवायचं… मला वाटतं हे सरकार ५ वर्ष चालेल आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे, असं संजय राऊत म्हणाले.
गीते नेमकं काय म्हणाले होते?
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना, अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.
कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे, असं अनंत गीते म्हणाले. उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असंही अनंत गीतेंनी नमूद केलं.
अतिनैराश्यातून गीते यांचे वक्तव्य; सुनील तटकरे आक्रमक
अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात अनंत गीते यांचा समाचार गेतला. गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. गीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचं कामाचं कौतुक होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांकडून काही वक्तव्य येत आहेत. गीतेंची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यांच्या विधानाला महत्व देण्याचं कारण नाही, असं तटकरे म्हणाले.




