नागपूर : ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी सारवासारव करत, माझे विधान गावातील गावगुंड असलेल्या मोदीनामक व्यक्तीबद्दल होते, असे त्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेते यावरुन चांगलेच संतापले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते, त्यावेळी नानांनी वरील विधान केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
पटोलेंना अटक करा, नारायण राणेंची मागणी
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाना पटोले यांना अटक करा अशी मागणी केली आहे. राणे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. नारायण राणे म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत. त्याचा मी निषेध करतो. कॉंग्रेसच्या नेत्यांनी अशा प्रकराची वक्तव्य केले याबद्दल मला नवल वाटले नाही. आता नाना पटोले यांना उटक करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला आहे.